.

गेल्या आठ दिवसांत झालेल्या दमदार पावसामुळे जिल्ह्यात खरिपाच्या पेरण्यांचे उद्दिष्ट पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. १ जून ते ४ ऑगस्ट कालावधीत ९५.४० टक्के (ऊसासह) क्षेत्रावर पेरणी झाली असली, तरी मूग आणि उडदाच्या पेरण्या ५० टक्क्यांवरच ठप्प झाल्या आहेत. दुसरीकडे मका आणि सोयाबीन या पिकांनी सरासरी क्षेत्राच्या तुलनेत शंभर टक्क्यांहून अधिक पेरणी नोंदवत आपला दबदबा कायम ठेवला आहे.
जिल्ह्यात खरिपाचे सरासरी ७ लाख १६ हजार २०८ हेक्टर क्षेत्र असताना, प्रत्यक्षात ६ लाख ८७ हजार ३८ हेक्टरवर पेरणी झाली आहे. यात सोयाबीनचे सरासरी क्षेत्र १ लाख ७८ हजार ५०५.६४ हेक्टर असून प्रत्यक्षात १ लाख ९६ हजार ९१८.५१ हेक्टरवर (११०.३२ टक्के) तर मक्याचे सरासरी क्षेत्र ७७ हजार ९९९ हेक्टर असताना, प्रत्यक्षात सर्वाधिक १ लाख २३ हजार ९४४.३१ हेक्टरवर (१५८.९० टक्के) पेरणी नोंदवली गेली. एकूण गळीत धान्यांची पेरणी १०८.२५ टक्के झाली. तृणधान्यांची एकूण पेरणी १०१.९९ टक्के झाली. यामध्ये बाजरीची ५४ हजार ८५२.६० हेक्टरवर तर तुरीचे सरासरी क्षेत्र ६४ हजार ५८४.९ हेक्टर असताना प्रत्यक्षात ८५ हजार ०२९.२ हेक्टरवर (१३१.६५ टक्के) पेरणी करण्यात आली. जिल्ह्यात कापसाची १ लाख ४१ हजार ४४०.७५ हेक्टर म्हणजेच ९१.०६ टक्के क्षेत्रावर लागवड झाली.
जूनच्या पहिल्या दोन आठवड्यांत पाऊस न पडल्याने मूग आणि उडदाच्या पेरण्या वेळेत होऊ शकल्या नाहीत. जिल्ह्यात मुगाचे सरासरी क्षेत्र ५१ हजार ९८० हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी २३ हजार ७४८ हेक्टरवर (४५.६९ टक्के) पेरणी झाली आहे. तर उडादाचे सरासरी क्षेत्र ६७ हजार ५९५ हेक्टर क्षेत्र असून ४० हजार ७१६ (६०.२४ टक्के) क्षेत्रावर पेरणी झाली. पेरणीचा कालावधी निघून गेल्याने यंदा मूग आणि उडदाचे एकूण उत्पादन घटण्याची दाट शक्यता आहे.