![]()
स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून अहिल्यानगर जिल्हा वाचनालयाच्या वतीने आयोजित शालेय चित्रकला स्पर्धेला यंदा विद्यार्थ्यांचा प्रतिसाद लाभला. कोऱ्या कागदावर कल्पनाशक्तीला रंगांची सुंदर साथ देत चिमुकल्यांनी देशभक्ती, निसर्ग, सामाजिक संदेश आणि विविध विषयांवरील आकर्षक चित्रे साकारली. बाई इचरजबाई फिरोदिया शाळेत झालेल्या या स्पर्धेत तब्बल १,१०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा वाचनालयाचे अध्यक्ष वैद्य राजा ठाकूर यांच्या हस्ते झाले. यावेळी उपाध्यक्ष दिलीप पांढरे, सहकार्यवाह राहुल तांबोळी, संचालिका शिल्पा रसाळ, स्पर्धेचे समन्वयक किरण आगरवाल, कवी चंद्रकांत पालवे, लेखक गणेश भगत, जालिंदर बोरुडे, ग्रंथपाल अमोल इथापे, सहाय्यक ग्रंथपाल नितीन भारताल, पल्लवी कुकडवाल, वर्षा जोशी, संजय गाडेकर, आर्यन मडूर आणि ओम केदारे उपस्थित होते. वैद्य राजा ठाकूर यांनी मार्गदर्शन करताना चित्रकला ही विद्यार्थ्यांच्या कल्पकता, सर्जनशीलता आणि संवेदनशीलतेला दिशा देणारी प्रभावी कला असल्याचे सांगितले. पुस्तक वाचनासोबत चित्रकला, लेखन आणि सांस्कृतिक उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचे सर्वांगीण व्यक्तिमत्त्व घडते. जिल्हा वाचनालय अशा स्पर्धांमधून विद्यार्थ्यांतील सुप्त कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देत असल्याचे त्यांनी नमूद केले. स्पर्धेदरम्यान विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर कल्पक आणि आकर्षक चित्रे रेखाटली. पालक व शिक्षकांनीही या उपक्रमाचे कौतुक केले. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ १८ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता जिल्हा वाचनालयाच्या लोकमान्य टिळक सभागृहात होणार असून विजेत्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात येणार असल्याची माहिती समन्वयक किरण आगरवाल यांनी दिली.
Source link
देशभक्ती, निसर्ग आणि सामाजिक संदेशाच्या चित्रांनी खुलला कॅनव्हास:जिल्हा वाचनालयाच्या चित्रकला स्पर्धेत 1,100 विद्यार्थ्यांचा सहभाग