![]()
सार्वजनिक आरोग्य व वैद्यकीय शिक्षण विभागातील परिचारिका संवर्गाच्या प्रलंबित, न्याय्य मागण्यांसाठी महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनच्या (एमजीएनएफ) नेतृत्वाखाली मंगळवारी, ४ ऑगस्टला राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली होती. या हाकेला ओ देत येथील परिचारिकांनी दोन तास काम बंद ठेऊन त्या-त्या रुग्णालयात निदर्शने केली. जिल्हा सामान्य रुग्णालय, जिल्हा स्त्री रुग्णालय, सुपर स्पेशालिटी, जीएमसी, क्षय रुग्णालयात सकाळी ७.३० ते ९.३० या वेळेत काम बंद ठेवून तेथील परिचारिकांनी घोषणाबाजी करीत तीव्र निदर्शने केली. संघटनेच्या प्रदेश कार्याध्यक्ष वर्षा पागोटे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन केले. शासन निर्णयानुसार जाहीर केलेल्या ‘१५० दिवसांच्या सेवाकर्मी कार्यक्रमाची’ मुदत २ ऑक्टोबर २०२५ रोजीच संपली. मात्र, मुदत संपूनही परिचारिकांचे सेवा प्रवेश नियम, सुधारित आकृतीबंध, पदोन्नतीसारखे प्रश्न प्रलंबितच आहेत. यामुळे परिचारिका पदोन्नतीपासून वंचित राहिल्या असून, रुग्णालयांत रिक्त पदांमुळे कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण पडत आहे, ज्याचा परिणाम रुग्णसेवेवर होत आहे. या पार्श्वभूमीवर सुधारित सेवा प्रवेश नियम अंतिम करावेत, सुधारित आकृतीबंधास शासन मान्यता द्यावी, प्रलंबित पदोन्नती प्रक्रिया पूर्ण करावी, रिक्त पदांवर सरळ सेवा भरती सुरू करावी या मागण्यांचे निवेदन जिल्हा शल्य चिकित्सकांमार्फत शासनाकडे पाठवले आहे. आंदोलनात विद्या चुडे, नलिनी पिंजरकर, पूनम खडसे, दुर्गा घोडीले, विद्या भुसारी, सपना वार्ड, साधना ठाकूर, प्रफुलता खडसे, जयश्री मोरे, मेघा चौबे, नीतू श्रीखंडे, साधना भोरे यांसह अनेक परिचारिका, संघटना प्रतिनिधी सहभागी झाल्या होत्या. तीव्र आंदोलन करण्याचा पदाधिकाऱ्यांचा इशारा शासनाने या मागण्यांवर सकारात्मक निर्णय न घेतल्यास पुढील काळात याहून अधिक तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा फेडरेशनच्या राज्य अध्यक्ष श्रीमती इंदुमती थोरात, राज्य सरचिटणीस विशाल सोनार यांनी दिला आहे.
Source link
परिचारिकांचे काम बंद,रुग्णालयाबाहेर निदर्शने:सुधारित सेवा प्रवेश नियम,पदोन्नतीसाठी आंदोलन