Headlines

मुंबई पोलिसात 6.41 कोटींचा बोगस पगार घोटाळा:दोन लिपिक निलंबित, जुन्या सेवार्थ प्रणालीचा कर्मचाऱ्यांकडून गैरफायदा, 5 वर गुन्हा दाखल




मुंबई पोलिस दलात कोट्यवधी रुपयांचा दरोडा पडल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संगनमत करून जुन्या सेवार्थ प्रणालीच्या त्रुटींचा गैरफायदा घेतला. अस्तित्वात नसलेल्या १० बोगस पोलिसांच्या नावे पगार लाटून तब्बल ६ कोटी ४१ लाख रुपयांचा अपहार करण्यात आला आहे. या प्रकरणी समतानगर पोलिस ठाण्यात ५ तत्कालीन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला असून गृह खात्याच्या दोन लिपिकांना निलंबित केले आहे. या प्रकरणी दोषींना कठोर कारवाईचे निर्देश गृह विभागाने दिले आहेत. डिसेंबर २०१९ ते सप्टेंबर २०२० या दहा महिन्यांत हा घोटाळा झाला. उत्तर प्रादेशिक विभागाच्या तक्रारीवरून हा गुन्हा नोंदवला गेला आहे. तत्कालीन प्रशासकीय अधिकारी रामकिशन गोस्वामी, नागेश तळवडेकर, विजया चव्हाण तसेच प्रमुख लिपिक अजय राठोड व वरिष्ठ लिपिक अमोल मेश्राम यांच्यावर आरोप ठेवले आहेत. विरोधकांचे सरकारवर आरोप, मुख्यमंत्र्यांचे सडेतोड प्रत्युत्तर या घोटाळ्याचे राजकीय पडसाद उमटले असून विरोधकांनी सरकारवर तीव्र टीका केली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी “राज्यात कारभार वेंधळा व भ्रष्ट असून मोगलाई सुरू आहे,” असा आरोप केला. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सखोल चौकशीची मागणी केली. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी “घोटाळेबाजांची गय केली जाणार नाही, कठोर कारवाईचे निर्देश दिले आहेत,” असे स्पष्ट केले. धुळे आणि लातूर कनेक्शनचा तपास शासकीय ऑडिटमध्ये हा प्रकार समोर आल्यावर प्रशासकीय यंत्रणा वेगाने कामाला लागली. यापूर्वी धुळे आणि लातूर जिल्ह्यांतही अशाच प्रकारे बोगस पगार लाटण्याचे प्रकार उघडकीस आले होते. त्यामुळे मुंबईतील हे रॅकेट त्याच टोळीशी संबंधित आहे का आणि यात एखादे आंतरजिल्हा जाळे सक्रिय आहे का, याचा समांतर तपास आता पोलिस करत आहेत. नवी प्रणाली बदलताना वेतनाच्या आकड्यात आढळली तफावत पोलिस कर्मचाऱ्यांचा डेटा जुन्या सेवार्थ प्रणालीतून नव्या आधुनिक प्रणालीत स्थलांतरित करण्याचे काम सुरू होते. याच प्रक्रियेदरम्यान ऑडिट टीमला २०१९ व २०२० मधील वेतनाच्या आकड्यांमध्ये तफावत दिसली. तपासात रामदास भोगले, सुधाकर कदम, सूरज यादव, भगवत भोसले, गुणाजी खावकर, महादेव हलदणकर, राजेंद्र सोनार, उत्तम थोरात, सूर्यकांत पाटील, पांडुरंग कदम यांच्या बँक खात्यात पगार जमा होत असल्याचे उघड झाले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *