![]()
शिक्षण, सहकार, राजकारण आणि क्रीडा क्षेत्रात भरीव योगदान देणारे पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. कोल्हापुरात जाऊन त्यांनी डॉ. पाटील यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेत कुटुंबीयांचे सांत्वन केले. त्यानंतर समाजमाध्यमावरील पोस्टमधून त्यांनी डॉ. पाटील यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या दूरदृष्टीचा उल्लेख केला. राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, एखादे विद्यापीठ किंवा मोठी संस्था उभी राहते तेव्हा केवळ इमारती उभ्या राहत नाहीत, तर त्याभोवती वसतिगृहे, रुग्णालये, लहान उद्योग, वाहतूक व्यवस्था आणि रोजगाराचे संपूर्ण अर्थकारण निर्माण होते. एका संस्थेमुळे संपूर्ण परिसराचा चेहरामोहरा बदलू शकतो, ही दूरदृष्टी जुन्या पिढीतील अनेक नेत्यांमध्ये होती. शिक्षण क्षेत्रात उभारलेल्या संस्था असोत किंवा नवी मुंबईतील स्टेडियम, दोन्ही ठिकाणी डॉ. डी. वाय. पाटील यांच्या विचारातील भव्यता आणि दीर्घकालीन दृष्टिकोन स्पष्टपणे दिसून येतो, असे त्यांनी नमूद केले. राज ठाकरे यांनी स्वातंत्र्यानंतरच्या शिक्षण व्यवस्थेचाही संदर्भ देत म्हटले की, देशाच्या वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत अभियांत्रिकी आणि वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या अपुरी होती. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आयआयटींसारख्या संस्थांची स्थापना करून उच्च शिक्षणाचा पाया घातला असला, तरी देशातील वाढती मागणी केवळ सरकारी यंत्रणेच्या माध्यमातून पूर्ण होणे शक्य नव्हते. त्यातच शिक्षणावरील सरकारी खर्चही दशकानुदशके कमी होत गेला. त्यामुळे शिक्षण क्षेत्रात खाजगी सहभाग अपरिहार्य ठरला, असे त्यांनी म्हटले. याच पार्श्वभूमीवर डॉ. डी. वाय. पाटील यांनी शिक्षण क्षेत्रात संस्थात्मक उभारणीचे मोठे काम केले. आदर्श परिस्थितीत प्रत्येकाला दर्जेदार शिक्षण सरकारमार्फत मिळायला हवे, याबाबत दुमत नसले तरी भारतातील वास्तव वेगळे होते. त्यामुळे खाजगी क्षेत्राने पुढाकार घेण्याची गरज निर्माण झाली. अशा काळात डॉ. डी. वाय. पाटील, पतंगराव कदम, बाळासाहेब विखे पाटील आणि दत्ता मेघे यांसारख्या नेत्यांनी उभारलेल्या शैक्षणिक संस्थांचे महत्त्व अधिक अधोरेखित होते, असे राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले. गेल्या तीन-चार दशकांत डॉक्टर, अभियंते, संशोधक, उद्योजक आणि विविध क्षेत्रांमध्ये काम करणारे लाखो विद्यार्थी या संस्थांतून घडले असून हे योगदान अत्यंत मोठे असल्याचेही त्यांनी सांगितले. राज ठाकरे यांनी पुढे म्हटले की, डॉ. डी. वाय. पाटील ज्या काळात सार्वजनिक जीवनात आले, तो काळ केवळ सत्तेचा नव्हता तर संस्थात्मक उभारणीचा होता. ग्रामीण महाराष्ट्रात सहकारी संस्थांच्या माध्यमातून आर्थिक परिवर्तन घडत असताना त्यांनी शिक्षण क्षेत्रात भक्कम पायाभरणी केली. राजकारणाच्या माध्यमातून समाजावर दीर्घकालीन ठसा उमटवणाऱ्या पिढीतील ते अखेरच्या महत्त्वाच्या प्रतिनिधींपैकी एक होते, अशा शब्दांत त्यांनी डॉ. पाटील यांना श्रद्धांजली वाहिली. पोस्टच्या शेवटी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे. हेही वाचा… अभिजीत दिपके म्हणाले- CJP सध्या राजकीय पक्ष बनणार नाही: दबावगटासारखे काम करू; देशाला नवा पक्ष नव्हे, मजबूत जनआंदोलनाची गरज! नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणी जंतर-मंतरवर यशस्वी आंदोलन उभारणाऱ्या कॉकरोच जनता पार्टीच्या (CJP) कोअर कमिटीची दोन दिवसीय बैठक छत्रपती संभाजीनगरमध्ये पार पडत आहे. या बैठकीपूर्वी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी देशातील सद्य राजकीय आणि न्याय व्यवस्थेवर कडक शब्दांत ताशेरे ओढले. तसेच, देशातील विविध संस्थांची ‘अकाउंटेबिलिटी’ (उत्तरदायित्व) आणि ‘निष्पक्षता’ परत आणण्यासाठी देशव्यापी जनआंदोलनाची आवश्यकता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अभिजीत दिपके यांच्या निवासस्थानी सुरू असलेल्या या बैठकीसाठी कॉकरोच जनता पार्टीचे सौरव दास, यतीन गोयल , वैष्णवी गौर, रत्ना सिंग, अक्षय मराठे, अजिंक्य शिंदे आणि आशुतोष रंका हे पदाधिकारी उपस्थित आहेत. येथे वाचा संपूर्ण बातमी
Source link
डी. वाय. पाटील यांच्या निधनानंतर राज ठाकरेंची भावनिक श्रद्धांजली:'विद्यापीठ उभं राहिलं की फक्त इमारती नव्हे, संपूर्ण अर्थकारण उभं राहतं'