Headlines

पुणे विषारी दारू बळी:तब्बल 21 जणांच्या मृत्यू प्रकरणी संघटित गुन्हेगारी टोळीवर 'मोक्का' अंतर्गत सीआयडीची कारवाई




पुणे जिल्ह्यातील हडपसर, दापोडी आणि फुरसुंगी परिसरात विषारी हातभट्टी दारूमुळे 21 जणांच्या मृत्यू प्रकरणी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात सहभागी असलेल्या संघटित गुन्हेगारी टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का) लागू करण्यात आला आहे. या कारवाईमुळे या गंभीर प्रकरणाच्या तपासाला अधिक गती मिळाली आहे. सीआयडीच्या तपासात, दत्ता ऊर्फ भाऊ भिवराव लोंढे याने स्वतःच्या नेतृत्वाखाली एक संघटित गुन्हेगारी टोळी तयार केल्याचे समोर आले आहे. या टोळीने साथीदारांच्या मदतीने अवैध हातभट्टी दारूची निर्मिती, वाहतूक आणि विक्री केली. यातून आरोपींनी बेकायदेशीर आर्थिक लाभ मिळवला, असे तपासात निष्पन्न झाले आहे. हा गुन्हा भारतीय न्याय संहिता तसेच मुंबई दारूबंदी कायद्यातील विविध कलमांखाली दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात दत्ता लोंढे याच्यासह आकाश जाधव, योगेश इस्नकर, राधेश्याम प्रजापती, कल्पेश अग्रवाल, आर्यन धोत्रे, अभिषेक करणे, अरुण चोचे आणि अंकित चोचे अशा एकूण नऊ जणांचा समावेश आहे. या आरोपींविरुद्ध यापूर्वीही गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. प्रतिबंधात्मक कारवाईनंतरही त्यांच्या गुन्हेगारी प्रवृत्तीत सुधारणा झाली नसल्याचे सीआयडीने म्हटले आहे. तपास अधिकाऱ्यांनी आरोपींच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची सखोल पडताळणी केली. त्यानंतर मोक्का कायद्यातील तरतुदींनुसार प्रस्ताव सादर करण्यात आला, ज्याला विशेष पोलिस महानिरीक्षक (गुन्हे), गुन्हे पश्चिम, महाराष्ट्र राज्य यांनी मंजुरी दिली. आता या प्रकरणात मोक्काअंतर्गत पुढील तपास आणि न्यायालयीन प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. ही कारवाई अपर पोलिस महासंचालक (सीआयडी) सुनील रामानंद, विशेष पोलिस महानिरीक्षक सुधीर हिरेमठ आणि पोलिस अधीक्षक शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलिस उपअधीक्षक शामराव काळे यांनी या प्रकरणाचा तपास केला आहे. विषारी दारू प्रकरणातील आरोपींवर ‘मोक्का’ लावल्याने राज्यातील अवैध दारू व्यवसायाविरोधात एक कठोर संदेश गेला असून, संघटित गुन्हेगारीविरोधातील ही एक महत्त्वाची कारवाई मानली जात आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *