![]()
जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटस्, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि सृजनसभा पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आठव्या प्राचार्य डॉ. सुधाकरराव जाधवर करंडक राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन विविध गुणदर्शन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा २० ते २२ ऑगस्ट दरम्यान नऱ्हे-मानाजीनगर येथील संस्थेच्या संकुलात होणार आहे. या तीन दिवसीय स्पर्धेत वक्तृत्व, लोकगीत गायन, वादविवाद, पथनाट्य, छोटा ख्याल गायन, नाट्यगीत गायन आणि एकल तबला वादन यांसारख्या विविध प्रकारांचा समावेश आहे. संस्थेचे उपाध्यक्ष ॲड. शार्दुल जाधवर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. युवा पिढीतील कलागुणांना वाव देण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेचे उद्घाटन गुरुवार, २० ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता होईल. उद्घाटनानंतर वक्तृत्व स्पर्धा होईल, ज्यासाठी ‘महात्मा ज्योतिबा फुले’, ‘भारतीय संत परंपरा आणि समरसता’ तसेच ‘महाभारतातील स्त्रिया: व्यक्तित्व व कर्तृत्व’ हे विषय आहेत. याच दिवशी लोकगीत गायन स्पर्धेत अभंग, भारुड आणि पोवाडा सादर केला जाईल. यासोबतच, १ ली ते १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी स्व. आमदार रमेशभाऊ वांजळे निबंधलेखन स्पर्धा आणि कै. उद्धवराव तुळशीराम जाधवर वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. शुक्रवार, २१ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजल्यापासून वादविवाद आणि पथनाट्य स्पर्धा सुरू होतील. वादविवाद स्पर्धेसाठी ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स – मानवाचा मित्र की प्रतिस्पर्धी?’ आणि ‘राजकारणात महत्त्व कशाला? पक्षनिष्ठा की व्यक्तिगत प्रगती?’ हे विषय निश्चित करण्यात आले आहेत. पथनाट्य स्पर्धेत ‘से नो टू ड्रग्ज’ या घोषणेपलीकडील कृती या विषयावर सादरीकरण करण्याची मुभा स्पर्धकांना असेल. शनिवार, २२ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता छोटा ख्याल गायन, नाट्यगीत गायन आणि एकल तबला वादन स्पर्धा होतील. सर्व स्पर्धा प्रकारांतील प्रथम विजेत्याला १५,५५५ रुपये, द्वितीय क्रमांकाला ११,१११ रुपये, तृतीय क्रमांकाला ७,७७७ रुपये आणि चषक प्रदान करण्यात येईल. उत्तेजनार्थ क्रमांक पटकावणाऱ्यांना ११११ रुपये व चषक दिला जाईल. एकूण २ लाख ५० हजार रुपयांहून अधिक रकमेची पारितोषिके देण्यात येणार आहेत. या स्पर्धेत पुणे, कोल्हापूर, कोकण, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आदी शहरांतील संघांनी सहभाग घेतला असून, नोंदणी प्रक्रिया सुरू आहे. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ बुधवार, २६ ऑगस्ट रोजी महाविद्यालयात होणार आहे. स्पर्धेत सहभागासाठी ७३५०५४४९०१ आणि ९९२३५३७४३६ या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.
Source link
पुणे येथे प्राचार्य डॉ. सुधाकरराव जाधवर करंडक स्पर्धा:जाधवर ग्रुप, एसपीपीयू आणि सृजनसभा यांच्यावतीने तीन दिवसीय आयोजन