Headlines

मंडई म्हसोबा ट्रस्टचे भूषण पुरस्कार जाहीर:उषा नाडकर्णी, अजिंक्य फिरोदिया, गहिनीनाथ महाराज औसेकर यांचा सन्मान




अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्टतर्फे १० ते १४ ऑगस्ट २०२६ दरम्यान म्हसोबा उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. मंडईतील बुरूड आळी येथे होणाऱ्या या उत्सवात विविध सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा आणि धार्मिक कार्यक्रमांचा समावेश आहे. ही माहिती ट्रस्टचे विश्वस्त उपाध्यक्ष निवृत्ती जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली. उत्सवाचा एक महत्त्वाचा भाग म्हणून, शुक्रवार, १४ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता भूषण पुरस्कार वितरण समारंभ आयोजित करण्यात आला आहे. यंदा ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी, कायनेटिक इंजिनिअरिंग लिमिटेडचे उपाध्यक्ष अजिंक्य फिरोदिया, रांका ज्वेलर्सचे संचालक फत्तेचंद रांका आणि विठ्ठल रुक्मिणी देवस्थान पंढरपूरचे सहअध्यक्ष गहिनीनाथ ज्ञानेश्वर महाराज औसेकर यांना विविध श्रेणींमध्ये ‘भूषण पुरस्कार’ प्रदान केले जाणार आहेत. याशिवाय, पत्रकारिता भूषण पुरस्कार ज्येष्ठ संपादक श्रीकांत साबळे, संगीत भूषण पुरस्कार संगीत दिग्दर्शक अविनाश-विश्वजीत यांना दिला जाईल. ज्येष्ठ सिनेनाट्य अभिनेते मोहन जोशी आणि मुंबईतील पोलीस उपनिरीक्षक सुमित जव्हेरी यांचाही विशेष सन्मान करण्यात येणार आहे. महावस्त्र, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, फळांची करंडी आणि श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. या पत्रकार परिषदेला ट्रस्टचे विश्वस्त अध्यक्ष राहुल सूर्यवंशी यांच्यासह राजेंद्र नांगरे, जतिन पांडे आणि गौतम तांबे उपस्थित होते. उत्सवाचा प्रारंभ सोमवार, १० ऑगस्ट रोजी सकाळी धार्मिक कार्यक्रमांनी होईल, त्यानंतर सायंकाळी ५ वाजता शिवनाद नृत्य महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. मंगळवार, ११ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता ‘वेनकॉब पुणे श्री २०२६’ ही जिल्हास्तरीय खुली शरीरसौष्ठव स्पर्धा होणार आहे. महाराष्ट्र बॉडी बिल्डर्स असोसिएशन संलग्न पुणे जिल्हा हौशी शरीरसौष्ठव संघटना, पिंपरी चिंचवड शरीर सौष्ठव संघटना आणि बॉडी बिल्डिंग अँड फिजिक्स स्पोर्ट्स पुणे यांच्या सहकार्याने ही स्पर्धा ७ वजनी गटांमध्ये होईल. बुधवार, १२ ऑगस्ट रोजी दीप अमावस्येनिमित्त सायंकाळी ७ वाजता ११०० दिव्यांचा दीपोत्सव आणि महाआरती आयोजित केली आहे. या प्रसंगी कालीपुत्र कालीचरण महाराज आणि श्री क्षेत्र दत्तधाम पीठ गंगापूर, नाशिकचे योगतपस्वी प.पू. दत्तदासजी महाराज उपस्थित राहणार आहेत. गुरुवार, १३ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजता सुमारे १ हजार गरजू विद्यार्थ्यांना २ लाख ५१ हजार रुपयांचे शालेय साहित्य प्रदान केले जाईल.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *