Headlines

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलन पुण्यात:डॉ. प्रज्ञा दया पवार अध्यक्षस्थानी, 16 ऑगस्टला विद्यापीठात आयोजन




पुण्यात ‘लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विचारवेध साहित्य संमेलन’ आयोजित करण्यात येणार आहे. ज्येष्ठ लेखिका आणि विचारवंत डॉ. प्रज्ञा दया पवार यांची या संमेलनाच्या अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली आहे. पद्मपाणी फाउंडेशन आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ कर्मचारी संघ यांच्या संयुक्त विद्यमाने हे संमेलन होणार आहे. हे विशेष वैचारिक साहित्य संमेलन 16 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परिसरात संपन्न होईल. संमेलनाचे संयोजन समिती अध्यक्ष राहुल डंबाळे यांनी डॉ. प्रज्ञा पवार यांनी अध्यक्षपद स्वीकारल्याची माहिती दिली. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुरोगामी, विद्रोही आणि कष्टकरी जनतेच्या हक्कांच्या विचारांचा वेध घेणे हा या संमेलनाचा मुख्य उद्देश आहे. अण्णाभाऊ साठे यांचे ‘जग बदल घालूनी घाव, सांगूनी गेले मज भीमराव’ हे विचार आजही समाजाला दिशा देणारे असल्याचे डंबाळे यांनी नमूद केले. डॉ. प्रज्ञा दया पवार यांचे मराठी साहित्य क्षेत्रातील योगदान आणि त्यांची सामाजिक जाणीव अत्यंत प्रगल्भ आहे. त्यांच्यासारख्या खंबीर आणि ज्येष्ठ विचारवंताचे नेतृत्व या संमेलनाला लाभल्यामुळे या वैचारिक सोहळ्याची उंची आणि समृद्धी अधिक वाढेल, असे राहुल डंबाळे म्हणाले. या संमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी संयोजन समितीचे प्राज्ञ वैशाली देठे, डॉ. राहुल ससाणे, सतीश वाघमारे आणि संतोष मदने हे परिश्रम घेत आहेत. संमेलनामध्ये विविध वैचारिक सत्रांचे, परिसंवादांचे आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याला पुणे शहर व महाराष्ट्रातील पुरोगामी चळवळीतील कार्यकर्ते, साहित्यिक, अभ्यासक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित राहतील अशी अपेक्षा आहे. तरी सर्व साहित्यप्रेमींनी आणि नागरिकांनी या संमेलनाला बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन पद्मपाणी फाउंडेशन आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ कर्मचारी संघाच्या वतीने करण्यात आले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *