पद्मश्री पुरस्काराने सन्मानित झालेले जगविख्यात कवी नामदेव ढसाळ यांची कविता पोस्ट केल्याबद्दल कवी संतोष दौंडे यांच्याविरोधात पोलिस ठाण्यामध्ये तक्रार झाल्याची माहिती समोर आलीय. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या पाथर्डी पोलिस ठाण्यात ही तक्रार दाखल झालीय. कवी स
.
संतोष दौंडे सुद्धा स्वतः कवी आहेत. त्यांचा ‘निर्जनांचे प्रदेश’ हा कवितासंग्रह प्रसिद्ध झाला आहे. मात्र, कविता पोस्ट केल्याचे प्रकरण थेट पोलिसांमध्ये गेल्याने साहित्यिकांनी टीकेची झोड उठवली आहे. स्वतः संतोष दौंडे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करून ही माहिती दिली.
संतोष दौंडे यांची पोस्ट जशीच्या तशी…
‘रात्रीचे दीड वाजलेत मित्रांनो. तरीही मी ही पोस्ट शेअर करतोय. त्यामागचं कारणही तसंच आहे. काल मी माझ्या एक रस्ता संवादाचा या व्हॉट्सॲप ग्रुपवरती ठीक आठ वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी पद्मश्री नामदेव ढसाळ यांची ‘मुंबई मुंबई माझ्या प्रिय रांडे..’ ही कविता पोस्ट केली होती. या ग्रुपमध्ये माझ्या सानिध्यातील काही लेखक कवी-मित्र आहेत. त्याचबरोबर पंचक्रोशितील काही शिक्षक आणि गावातील स्थानिक लोकही आहेत.
तर झालं असं की गावातील काही मनुवादी प्रवृत्तीच्या लोकांनी त्याविरोधात पाथर्डी पोलिस ठाण्यात माझ्याविरोधात एन. सी. आर. नोंदवला. आज सायंकाळी ठीक सहा साडेसहा वाजता एक काळ्या रंगाची खाजगी फोर व्हीलर माझ्या घरासमोर येऊन थांबली. त्यातून तीन सिव्हील मध्ये असलेले पोलिस माझ्याकडे आले. त्या पोस्टच्या संदर्भात तुम्हाला पोलिस स्टेशनला यावे लागेल असे त्यांनी मला सांगितले. त्यांची भाषा सौम्य आणि नम्र होती.

पोलिस प्रशासनाला सहकार्य करता यावे म्हणून मी त्यांच्यासोबत जाण्याची तयारी दाखवली. पण मला लो ब्लड प्रेशरचा त्रास असल्यामुळे मी माझी बायको अर्चना हिलाही माझ्यासोबत घेतले. पाथर्डी पोलिस स्टेशनचे पी. आय. कोकरे साहेब यांनी मला या कवितेसंदर्भात स्पष्टीकरण मागितले. नामदेव ढसाळांनी कविता आणि मी पोस्ट केलेली कविता यातील कंटेंट एकच आहे का यासंदर्भात त्यांनी व्हेरीफिकेशन केले.
दरम्यान त्यांना डी. वाय. एस. पी. साहेबांचा फोन आला. अर्थात हा फोन देखील मी पोस्ट केलेल्या नामदेव ढसाळ यांच्या कवितेसंदर्भातच होता. पोस्ट केलेला कवितेतील कंटेंट नामदेव ढसाळ यांच्या कवितेतीलच आहे आणि पोस्ट करणारा व्यक्ती स्वतः देखील कवी आहे त्यामुळे मी ही फिर्याद इथेच डिसमिस करतोय असे त्यांनी डी. वाय. एस. पी. साहेबांना कळविले.

पोलिस प्रशासनाला मी क्लेम करत नाही. कायदा व सुव्यवस्था राखता यावी यासाठीच ते त्यांचे कर्तव्य बजावत होते. माझा क्लेम आहे तो गावातील बी. जे. पी. धार्जिण्या म्होरक्यांवर – अमोल नलवडे (बी. जे. पी. तालुका उपाध्यक्ष, पाथर्डी) व रामदास काकडे (माजी उपसरपंच). रामदास काकडे याचा भाऊ आय. पी. एस. आहे. बी. जे. पी. चा अजेंडा काय आहे, हे मी सांगण्याची गरज नाही.
साहजिकच हे लोक बीजेपी समर्थक असल्यामुळे यांच्या पाठराखणीला आमच्या भागातील याच पक्षाच्या लोकप्रतिनिधिंचा वरदहस्त आहे. माझ्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करू पाहणाऱ्या या अराजक व्यवस्थेविरोधात मी तुम्हा सर्व लेखक, कवी, विचारवंत, आणि कलावंतांना आव्हान करत आहे. तासाभरापूर्वी पोलिस स्टेशनमधून मी घरी आलो आहे.
नामदेव ढसाळांची कविता पोस्ट केल्यामुळे म्हणजे कायद्याच्या भाषेत मी वादग्रस्त पोस्ट व्हॉट्सॲपवरती शेअर केल्यामुळे मला उद्या पुन्हा पोलिस ठाण्यात हजेरी लावण्यास जायचे आहे. साडेबारा वाजता मी पोलिस स्टेशनमधून घरी आलो आहे. उद्या माझे काही बरेवाईट झाल्यास याच लोकांना जबाबदार धरण्यात यावे. कळावे तुमचाच.’ – संतोष दौंडे

साहित्य वर्तुळातून निषेध व्यक्त
संतोष दौंडे यांच्याविरोधात पोलिस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवल्याच्या घटनेबद्दल साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त जेष्ठ कवी श्रीकांत देशमुख यांनी संताप व्यक्त केलाय. सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये ते म्हणतात, ‘Santosh Daunde हा बीड नगर सीमेवरला एक चांगला कवी. शेतमजुरी करणारा, अतिशय कष्टाने तरी आनंदाने संसाराचा गाडा ओढत चांगल्या कवितेवर, एकूणच लेखनावर प्रेम करणारा. ‘निर्जनांचे प्रदेश’ हा त्याचा कवितासंग्रह हस्ताक्षरच्या विनायक येवलेने प्रकाशित केलेला.
नामदेव ढसाळ यांची एक कविता समाज माध्यमावर टाकल्यानंतर त्याला झालेला त्रास त्याने आज कथन केला आहे. उद्या कदाचित तुकोबांचे विद्रोही अभंग टाकले तर तुम्हालाही अटक होऊ शकेल ! संतोष दौंड यांना अकारण त्रास देणाऱ्या बिनडोक पोलीस यंत्रणेचा जाहीर निषेध तर करायलाच हवा ! तक्रारीचे स्वरूप पहाता मुळात पोलिसांनी दखलच घ्यायला नको होती. पण ‘अमृत भक्तांनी’ तक्रार केल्यानंतर ती नाकारण्याचा अधिकार पोलिसांना देखील नसतो.’
