![]()
गंभीररीत्या भाजलेल्या रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी देशात त्वचादान आणि ‘स्किन बँकिंग’ची व्यवस्था अधिक मजबूत करण्याची अत्यंत आवश्यकता असल्याचे प्रतिपादन भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस व राज्यसभा खासदार विनोद तावडे यांनी आज राज्यसभेत केले. या संवेदनशील मुद्द्याकडे सरकारचे लक्ष वेधताना त्यांनी संपूर्ण देशभरात त्वचादानासाठी व्यापक यंत्रणा उभारण्याची मागणी केली. तसेच ‘नोटो’ (NOTTO) अंतर्गत देशभरात स्किन बँक्सची स्थापना, कोल्ड-चेन नेटवर्कची उभारणी आणि याविषयीची जनजागृती वाढवण्याचे महत्त्वपूर्ण आवाहनही त्यांनी केंद्र सरकारला केले आहे. विनोद तावडे म्हणाले की, गंभीर भाजलेल्या रुग्णांसाठी दान केलेली त्वचा ही एखाद्या संरक्षकासारखे काम करते. यामुळे रुग्णाच्या शरीराला संसर्ग होत नाही आणि शरीरातील पाणी कमी होत नाही. कायमस्वरूपी उपचार होईपर्यंत ही त्वचा रुग्णाचा जीव वाचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. सरकारने ‘NOTTO’ (राष्ट्रीय अवयव आणि उती प्रत्यारोपण संघटना) च्या माध्यमातून अवयवदानासाठी चांगले काम केले आहे. मात्र, त्वचादानाबाबत अजूनही समाजात पुरेशी जनजागृती झालेली नाही. जर आपण स्किन बँक्सची संख्या वाढवली आणि संपूर्ण देशात त्वचा संकलनाची उत्तम व्यवस्था केली, तर हजारो रुग्णांना वेळेवर मदत मिळू शकेल, असे तावडे यांनी म्हटले आहे. त्वचादानाबाबतची सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे, मृत्यूनंतर 6 तासांच्या आत हे दान करता येते आणि त्यासाठी रक्तगट जुळण्याची कोणतीही आवश्यकता नसते. यामध्ये केवळ त्वचेचा वरचा थर काढला जात असल्याने मृतदेहाचे विद्रूपीकरण होत नाही, शिवाय योग्य पद्धतीने जतन केलेली ही त्वचा 5 वर्षांपर्यंत वापरता येते. याविषयी आपल्या भावना व्यक्त करताना खासदार विनोद तावडे म्हणाले की, माझ्या आईच्या निधनानंतर हा विषय माझ्यासाठी अत्यंत जिव्हाळ्याचा बनला आहे. म्हणूनच, ‘नोटो’ (NOTTO) अंतर्गत त्वचादानासाठी एक भक्कम राष्ट्रीय व्यवस्था उभारली जावी, अशी माझी सरकारला विनंती आहे. आधुनिक स्किन बँक्सची उभारणी, जलद वाहतूक व्यवस्था आणि देशभरात व्यापक जनजागृती मोहीम राबवणे गरजेचे आहे, जेणेकरून कोणत्याही गरजू रुग्णाचा उपचाराअभावी मृत्यू होणार नाही.
Source link
'त्वचादानासाठी देशात सक्षम यंत्रणा उभारा':खासदार विनोद तावडेंची राज्यसभेत आग्रही मागणी; 'नोटो'अंतर्गत स्किन बँक्स वाढवण्याचे आवाहन