![]()
घाटनांद्रा गावाची पिण्याच्या पाण्याची तहान भागविणाऱ्या जोगेश्वरी रस्त्यावरील ‘शेरी हाडोळ’ लघु तलावाच्या सांडव्याला मोठे भगदाड पडल्याने या तलावाच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तलाव पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर सांडवा फुटल्यास मोठा अनर्थ ओढवण्याची शक्यता निर्माण झाली असून, परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरून मोठे नुकसान होऊ शकते. त्यामुळे या सांडव्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी केली आहे. घाटनांद्रा येथील हा तलाव दरवर्षी पावसाळ्यात शंभर टक्के भरत असल्याने गावाची भीषण पाणिटंचाई दूर होण्यास मोठी मदत होते. त्यामुळे हा जलस्त्रोत ग्रामस्थांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. मात्र, सध्या सांडव्याला मोठे भगदाड पडल्यामुळे तलावाची सुरक्षितता धोक्यात आली आहे. याबाबत ग्रामस्थांनी उपविभागीय जलसंधारण अधिकारी, जलसंधारण उपविभाग सिल्लोड यांच्याकडे वारंवार लेखी तक्रारी करूनही प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही, असा गंभीर आरोप नागरिकांनी केला आहे. फक्त सांडवाच नव्हे, तर तलावाच्या मुख्य भिंतीवरही मोठ्या प्रमाणावर झाडेझुडपे वाढली आहेत. बाभूळ, बोर यांसारख्या वनस्पतींच्या मुळांमुळे तलावाची भिंत आतून कमकुवत झाली असून, भिंत फुटण्याची भीती कायम आहे. तसेच जलसंधारण विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या या तलावाच्या परिसरामध्ये शेजारील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे केल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला आहे. संबंधित विभागाने या गंभीर बाबीची तातडीने दखल घेत घटनास्थळी पाहणी करावी, सांडव्याची त्वरित दुरुस्ती करावी, भिंतीवरील झाडाझुडपांची छाटणी करावी आणि अतिक्रमणांवर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे. प्रशासनाने तातडीने पावले न उचलल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. मागील वर्षीचे नुकसान आणि प्रशासनाचे दुर्लक्ष मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीदरम्यान या तलावाच्या सांडव्याची ‘गाईड वॉल’ वाहून गेली होती. यामुळे शेजारील शेतात पाणी शिरून शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला होता व शेतीमालाचे प्रचंड नुकसान झाले होते. याबाबतही जलसंधारण विभागाकडे तक्रार नोंदवण्यात आली होती; परंतु प्रशासनाने याकडे सातत्याने दुर्लक्ष केल्याचा आरोप उपसरपंच आकाश गुळवे यांनी केला. शासनाच्या मंजुरीनंतर दुरुस्तीचे काम होणार Ãतलावाच्या भिंतीवरील झाडे काढणे आणि सांडव्याच्या दुरुस्तीच्या कामासाठी शासनाकडे मंजुरीसाठी प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. शासनाची मंजुरी मिळाल्यानंतर सांडव्याची दुरुस्ती करण्यात येईल. -महेश बनशेट्टी, उपविभागीय जलसंधारण अधिकारी, सिल्लोड
Source link
घाटनांद्र्याची तहान भागवणाऱ्या शेरी हाडोळ तलावाच्या सांडव्याला भगदाड:सांडव्याची दुरुस्ती, भिंतीवरील झाडाझुडपांची छाटणी करण्याची मागणी