![]()
व्यक्ती बदलली तर कुटुंब बदलते, कुटुंब बदलले तर समाज बदलतो आणि समाज बदलला तर राष्ट्र बदलते, असे सांगत विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी केवळ आर्थिक प्रगती पुरेशी नसून व्यसनमुक्त, निरोगी, चारित्र्यसंपन्न आणि मूल्याधिष्ठित नागरिक घडणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन ब्र.कु. डॉ. डोनिका दीदी रूपारेल यांनी केले. भारत सरकारच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय आणि प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या राजयोग एज्युकेशन अँड रिसर्च फाउंडेशनच्या वैद्यकीय प्रभाग यांच्या संयुक्त विद्यमाने देश पातळीवर सुरू झालेल्या १० कोटी नशामुक्ती प्रतिज्ञा महाअभियानाची तालुकास्तरीय सुरुवात येथील ब्रह्माकुमारीज राजयोग भवन सेवा केंद्र येथे शनिवारी करण्यात आली. यावेळी भाजप युवा मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष रणवीर राऊत, नगरसेविका सायरा मुल्ला, रोटरी क्लब बार्शीचे अध्यक्ष नवनाथ गुल्हाणे तसेच महिला पत्रकार राजश्री गवळी उपस्थित होते. प्रमुख वक्त्या ब्र. कु. डॉ. रूपारेल (संभाजीनगर) यांनी प्रोजेक्टरद्वारे पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून उपस्थितांना मार्गदर्शन केले. व्यसनामागील मूळ कारणे ताणतणाव, नैराश्य, एकटेपणा, आत्मविश्वासाचा अभाव आणि जीवनातील उद्दिष्टांचा अभाव ही आहे. त्यावर उपाय म्हणजे अंतर्मन आहे. राजयोग मेडिटेशनमुळे आत्मविश्वास, आत्मसन्मान, मानसिक स्थैर्य आणि सकारात्मक विचारशक्ती विकसित होते. व्यक्तीमध्ये कोणत्याही व्यसनावर मात करण्याची अंतर्गत शक्ती निर्माण होते. अभियानात सहभागी होऊन किमान दहा नागरिकांना नशामुक्तीच्या प्रतिज्ञेशी जोडण्याचे आवाहन केले. बार्शी सेवाकेंद्राच्या संचालिका ब्र.कु. संगीता दीदींनी मनोगत व्यक्त करून अभियानाची भूमिका स्पष्ट केली. यावेळी वृक्षमित्र केदारनाथ वळेकर तसेच ओन्ली समाजसेवा बहुउद्देशीय संस्था यांच्या वतीने कार्यक्रमास अतिथी म्हणून उपस्थित मान्यवरांना रोपे भेट देण्यात आली. यावेळी ब्र. कु. महादेवी दीदी (परंडा), ब्र. कु. मीरा दीदी (वैराग) आणि ब्र.कु. निशा दीदी (बार्शी) यांनी भेटवस्तू देऊन मान्यवरांचा सत्कार केला. ब्र. कु. सुनीता दीदींनी आभार मानले. शहर व तालुक्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, महाविद्यालये, आयटीआय, तंत्रनिकेतने, शासकीय कार्यालये, ग्रामपंचायती, नगरपालिका, सामाजिक व धार्मिक संघटना तसेच विविध समाजघटकांपर्यंत पोहोचून व्यापक जनजागृती केली जाणार आहे. विशेषतः भावी पिढी व्यसनापासून दूर राहून सुदृढ, सुसंस्कृत आणि चारित्र्यसंपन्न नागरिक म्हणून घडावी, या उद्देशाने प्रतिज्ञा अभियान, राजयोग मेडिटेशन कार्यशाळा, व्याख्याने, रॅली, प्रदर्शन व विविध जनजागृती उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
Source link
व्यसनमुक्त, मूल्याधिष्ठित नागरिक घडणे गरजेचे:डॉ. डोनिका रूपारेल यांचे प्रतिपादन, ब्रह्माकुमारीजच्या नशामुक्ती प्रतिज्ञा महाअभियानाचा शुभारंभ