Headlines

राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार:नाशिक, जळगावसह मराठवाड्यातील 7 जिल्ह्यांना यलो अलर्ट, कोकण-मध्य महाराष्ट्रात हलक्या सरी




राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने तापमानात आणि उकाड्यात वाढ झाली होती. मात्र, आता पुन्हा एकदा हवामानात मोठा बदल होत असून, राज्याच्या अनेक भागांत पावसाचा जोर वाढण्याची चिन्हे आहेत. भारतीय हवामान विभागाने आज (८ ऑगस्ट) नाशिक आणि जळगावसह मराठवाड्यातील ७ जिल्ह्यांना विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा इशारा देत ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. ‘या’ ७ जिल्ह्यांना यलो अलर्ट हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, आज राज्यात प्रामुख्याने नाशिक, जळगाव, जालना, परभणी, हिंगोली, लातूर आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाचा तडाखा बसू शकतो. या भागांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार वारे वाहण्याची आणि मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांतील नागरिकांनी घराबाहेर पडताना योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात हलक्या सरी यलो अलर्ट असलेल्या जिल्ह्यांव्यतिरिक्त कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या उर्वरित भागांमध्ये तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळू शकतात. सध्या ‘अल निनो’चा (El Nino) वाढता प्रभाव आणि पावसाची ओढ यामुळे नागरिक प्रचंड उकाड्याने त्रस्त आहेत. मात्र, स्थानिक पातळीवर हवामानात होणाऱ्या या अचानक बदलांमुळे काही भागांत नागरिकांना उकाड्यापासून थोडासा दिलासा मिळू शकतो. पावसाचे कारण काय? हवामान तज्ज्ञांच्या माहितीनुसार, सध्या पश्चिम बंगाल आणि बांगलादेशच्या परिसरामध्ये समुद्रसपाटीपासून सुमारे ७.६ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे. या हवामान प्रणालीचा परिणाम म्हणून आज पश्चिम बंगालच्या किनारपट्टीजवळ एक नवीन ‘कमी दाबाचे क्षेत्र’ तयार होण्याचा अंदाज आहे. या प्रणालीची पुढील वाटचाल कशी राहते, यावरच महाराष्ट्रातील आगामी पावसाचे स्वरूप आणि तीव्रता अवलंबून असणार आहे. कुठे धो-धो, कुठे कोरडेच; जिल्ह्यात पावसाचा लहरी अंदाज:7 ऑगस्टपर्यंत 244.4 मिमी पाऊस; अकोले तालुका आघाडीवर, राहुरीमध्ये सर्वाधिक तूट‎ यंदाच्या पावसाळ्यात अहिल्यानगर जिल्ह्यावर वरुणराजाची कृपादृष्टी राहिली आहे. ७ ऑगस्टपर्यंत जिल्ह्यात तब्बल २४४.४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षी ७ ऑगस्टपर्यंत केवळ १४१ मिमी पाऊस झाला होता. त्यामुळे यंदा आतापर्यंत गतवर्षीच्या तुलनेत १०३.४ मिमी अधिक पाऊस झाला आहे. मात्र, जिल्ह्यात पावसाचे वितरण समान नसून अकोलेपासून राहुरीपर्यंत पर्जन्यमानात मोठी तफावत दिसून येत आहे. यंदा ३० जूनपर्यंत जिल्ह्यात ६६.१ मिमी, ३१ जुलैपर्यंत २३१ मिमी, तर ७ ऑगस्टपर्यंत २४४.४ मिमी पाऊस झाला. गतवर्षी ३० जूनपर्यंत ८१ मिमी आणि ३१ जुलैअखेर १२३ मिमी पावसाची नोंद झाली होती. यंदाच्या पावसात अकोले तालुका आघाडीवर असून तेथे तब्बल ५५० मिमी पाऊस झाला आहे. त्यापाठोपाठ कर्जत २९७.५, जामखेड २८५.१, श्रीगोंदे २५९.७, कोपरगाव २६०.५, पारनेर २५४.३, संगमनेर २१३, अहिल्यानगर २१६.१, राहाता १८०.१, पाथर्डी १७७.६, शेवगाव १६५.७, नेवासे १६१.९, श्रीरामपूर १३९, तर राहुरीत सर्वात कमी ८६.६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे अहिल्यानगर शहराला पाणीपुरवठा होणाऱ्या मुळा धरणाचा परिसर असलेल्या राहुरी तालुक्यातच पावसाचे प्रमाण सर्वात कमी राहिले आहे. त्यामुळे जिल्ह्यात पाऊस वाढला असला तरी त्याचे भौगोलिक वितरण असमान असल्याचे चित्र आहे. यंदा मान्सून काळात कमी दाबाचे पट्टे तसेच बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रावरून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांच्या प्रवाहात सातत्य राहिले नाही. वारे ज्या भागातून वेगाने वाहतात, त्या पट्ट्यात अधिक पाऊस पडतो; तर लगतच्या भागात पावसाचे प्रमाण कमी राहते. जुलैमध्ये काही भागांत जोरदार पाऊस झाल्याने जिल्ह्याची आकडेवारी वाढली असली, तरी पाऊस सातत्याने न पडता टप्प्याटप्प्याने झाल्याने तालुकानिहाय तफावत वाढली आहे. हेही वाचा.. दिल्ली-NCR मध्ये पाऊस, वाहतूक कोंडी:बिहारच्या बगहामध्ये 300 घरे पाण्याखाली; आग्र्यात रस्ता खचल्याने 20 फूट खोल खड्डा
राजधानी दिल्लीत शुक्रवारी मुसळधार पावसाने हजेरी लावली. दिल्ली आणि गुरुग्रामला जोडणाऱ्या महामार्गासह अनेक प्रमुख रस्त्यांवर चार फुटांपर्यंत पाणी साचल्याने वाहने मध्येच अडकून पडली. अनेक भागांत वाहतूक कोंडी झाल्याचे वृत्त आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) शनिवारीही दिल्लीसाठी ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात दिल्लीत आतापर्यंत १२७ मिमी पावसाची नोंद झाली आहे, जी २०११ नंतरची सर्वाधिक नोंद आहे. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *