Headlines

मुंबईतील आणखी 4 हॉटेलवर FDAचा दणका:परवाने निलंबित, IIT बॉम्बेच्या दोन मेसलाही टाळे; बीडमध्येही तब्बल 1.94 कोटींचा खाद्यतेलाचा साठा जप्त




अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) कारवाईचा धडाका राज्यभर सुरू असून अस्वच्छता आणि अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर कठोर कारवाई केली जात आहे. आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर भेसळयुक्त अन्नपदार्थ, अस्वच्छ हॉटेल्स, बेकायदा खाद्यपदार्थ विक्री आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांविरोधात कारवाईला वेग आला आहे. आता मुंबईतील आणखी चार हॉटेल्सवर FDAने कारवाई करत त्यांचे अन्न परवाने निलंबित केले आहेत. तपासणीदरम्यान या हॉटेल्समध्ये अस्वच्छता, झुरळे, घरमाशांचा वावर, गंजलेली भांडी आणि अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन आढळून आले. कारवाई करण्यात आलेल्या हॉटेल्समध्ये दादरमधील इट निनो, अंधेरीतील जय माँ काली ढाबा, सांताक्रूझमधील हाऊस ऑफ महाराष्ट्रा आणि कुर्ल्यातील साऊथ इंडियन डोसा कॉर्नर ांचा समावेश आहे. FDAच्या तपासणीत स्वयंपाकघर आणि अन्नपदार्थ तयार करण्याच्या ठिकाणी स्वच्छतेच्या नियमांकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे आढळले. अन्नपदार्थांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक असलेल्या नियमांचे पालन न केल्याने संबंधित हॉटेल्सचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. IIT बॉम्बेच्या हॉस्टेल मेसवरही कारवाई मुंबईतील पवई येथील IIT बॉम्बे कॅम्पसमध्येही FDAच्या अन्न सुरक्षा विभागाने तपासणी केली. कॅम्पसमधील तीन हॉस्टेल मेसची तपासणी करण्यात आली. या तपासणीत हॉस्टेल क्रमांक 1 आणि हॉस्टेल क्रमांक 3 मधील मेसकडे अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार आवश्यक अन्न परवाना किंवा नोंदणी नसल्याचे आढळून आले. त्यामुळे या दोन्ही मेसना अन्नपदार्थ विक्रीचा व्यवसाय तात्काळ बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना अन्न पुरवणाऱ्या मेसच्या अन्न सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. परवाना किंवा नोंदणी नसताना या मेस सुरू कशा होत्या, असा सवालही उपस्थित होत आहे. दरम्यान, हॉस्टेल क्रमांक 12, 13 आणि 14 मधील अन्नपूर्णा कॅटरिंग सर्विसेसचीही तपासणी करण्यात आली. या आस्थापनाकडे राज्यस्तरीय अन्न परवाना असल्याचे आढळले. मात्र तपासणीदरम्यान काही त्रुटी निदर्शनास आल्याने संबंधित कॅटरिंग सर्विसेसला सुधारणा नोटीस बजावण्यात आली आहे. बीडमध्ये 1.94 कोटींचा खाद्यतेलाचा साठा जप्त मुंबईबरोबरच बीड जिल्ह्यातही अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. खाद्यतेलाचे बेकायदा रिपॅकिंग आणि साठवणूक करणाऱ्या पाच आस्थापनांवर छापे टाकण्यात आले. या कारवाईत तब्बल 1 कोटी 94 लाख 50 हजार 922 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये तब्बल 1 लाख 19 हजार 186 किलो खाद्यतेलाचा साठा असल्याचे समोर आले आहे. रिफाइंड आणि अल्ट्रा रिफाइंड अशा वेगवेगळ्या नावांनी आणि वेगवेगळ्या पॅकिंगमध्ये एकाच प्रकारचे तेल बाजारात विकण्याचा प्रकार सुरू असल्याचे तपासणीत आढळून आले. FDAने बीड शहरातील दोन ऑईल रिपॅकिंग युनिट, वडवणीतील एका आस्थापना आणि माजलगावमधील सुट्टे खाद्यतेल साठवणाऱ्या दोन आस्थापनांवर कारवाई केली. यामध्ये स्वागत ऑईल इंडस्ट्रीज, चरखा ऑईल मिल, जय हनुमान ट्रेडर्स, जानवी कमर्शियल आणि विनायक ऑइल मिल यांचा समावेश आहे. या पाचही आस्थापनांचे परवाने तत्काळ निलंबित करून संबंधित ठिकाणे सील करण्यात आली आहेत. तुकाराम मुंढे आयुक्त झाल्यानंतर कारवाईला वेग अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त म्हणून तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर राज्यात FDAच्या कारवायांकडे विशेष लक्ष वेधले गेले आहे. गुटखा, भेसळयुक्त पदार्थ, औषधांमधील अनियमितता, अन्नपदार्थांची बेकायदा विक्री तसेच हॉटेल आणि खाद्य आस्थापनांमधील नियमभंगाविरोधात सातत्याने कारवाई केली जात आहे. मुंबईतील हॉटेल्सपासून IIT बॉम्बेच्या मेसपर्यंत आणि बीडमधील खाद्यतेलाच्या साठ्यापर्यंत झालेल्या या कारवायांमुळे अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर FDAचा वॉच आणखी कडक झाल्याचे चित्र आहे. नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर यापुढेही कारवाई सुरू राहणार का आणि राज्यातील आणखी कोणत्या आस्थापनांवर FDAचा बडगा उगारला जाणार, याकडे आता लक्ष लागले आहे. हेही वाचा.. राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार : नाशिक, जळगावसह मराठवाड्यातील 7 जिल्ह्यांना यलो अलर्ट, कोकण-मध्य महाराष्ट्रात हलक्या सरी राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने तापमानात आणि उकाड्यात वाढ झाली होती. मात्र, आता पुन्हा एकदा हवामानात मोठा बदल होत असून, राज्याच्या अनेक भागांत पावसाचा जोर वाढण्याची चिन्हे आहेत. भारतीय हवामान विभागाने आज (८ ऑगस्ट) नाशिक आणि जळगावसह मराठवाड्यातील ७ जिल्ह्यांना विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा इशारा देत ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *