Headlines

न्यायालयावर दबाव आणण्याचा मोदींचा प्रयत्न:फुटीर खासदारांना भेटणं हा गुन्हा; संजय राऊतांचा पंतप्रधान मोदींवर गंभीर आरोप




उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटातील खासदारांनी नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली. या भेटीवरून आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदी आणि भाजपवर टीका केली आहे. “पंतप्रधानांनी त्यांच्या निवासस्थानी गद्दारांसाठी ‘कॅटरिंग सर्व्हिस’ सुरू केली आहे,” असा टोला लगावतानाच, फुटीर खासदारांना पाठिंबा देऊन मोदी न्यायालयावर दबाव आणत असल्याचा गंभीर आरोप राऊत यांनी केला आहे. “गद्दारांना चहा-नाश्ता, आणि आम्हा जुन्या खासदारांना डावललं” पत्रकार परिषदेत बोलताना संजय राऊत म्हणाले, “पंतप्रधान हे संपूर्ण देशाचे नसून केवळ भाजपमधील एका गटाचे पंतप्रधान आहेत. त्यांना संपूर्ण भाजपदेखील स्वीकारायला तयार नाही. मोदींनी दिल्लीतील निवासस्थानी आपली ‘कॅटरिंग सर्व्हिस’ सुरू केली आहे. जे लोक पक्ष फोडून गेले आहेत, अशा गद्दारांना ते ब्रेकफास्ट आणि चहाला बोलावतात आणि आश्वासने देतात. एरवी ते कोणालाही भेटत नाहीत. मी गेल्या २५ वर्षांपासून खासदार आहे, पण आम्हा जुन्या आणि इतर खासदारांना ते का बोलावून घेत नाहीत?” “हा तर न्यायालयावर दबाव आणण्याचा प्रयत्न” शिंदे गटाच्या खासदारांना मोदींनी दिलेल्या पाठिंब्यावर आक्षेप घेत राऊत यांनी हा न्यायालयाचा अवमान असल्याचे म्हटले आहे. “गद्दारांचे प्रकरण सध्या न्यायालयात प्रलंबित आहे. त्यांच्या गद्दारीवर सुनावणी सुरू असताना पंतप्रधान त्यांना सांगतात की, ‘मी तुमच्या पाठीशी उभा आहे.’ मग तुम्ही पुढे काय करणार आहात? हा थेट न्यायालयावर दबाव आणण्याचा मोदींचा प्रयत्न आहे. फुटीर आणि पक्षांतर केलेल्या खासदारांना अशा प्रकारे भेटणे आणि त्यांना उघड समर्थन देणे हा एक गुन्हा आहे,” असे राऊत म्हणाले. संसदेतील गैरहजेरीवरून निशाणा पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांच्या संसदेतील उपस्थितीवरही राऊत यांनी बोट ठेवले. ते म्हणाले, “मोदी गद्दार खासदारांना ब्रेकफास्टला बोलावतात, पण गेल्या १५ दिवसांहून अधिक काळ ते संसदेत येऊ शकलेले नाहीत. गृहमंत्री अमित शहा देखील संसदेत आले नाहीत, हे देशासाठी अत्यंत दुर्दैवी आहे.” “नारीशक्तीची केवळ कागदावर चर्चा, आधी माफी मागा” संसदेत मांडण्यात आलेल्या ‘नारीशक्ती’ विधेयकावरूनही राऊतांनी सरकारला लक्ष केले. “महिला आरक्षणाचे विधेयक आणण्याआधी मोदींनी जंतर-मंतरवर आंदोलन करणाऱ्या लहान मुलींची माफी मागितली पाहिजे. त्या मुलींवर पोलिसांनी जो अत्याचार केला, त्या अत्याचाराचे सूत्रधार पंतप्रधान मोदी आणि अमित शहा हेच आहेत. केवळ कागदावर नारीशक्ती आणून चालणार नाही,” असा हल्लाबोल त्यांनी केला. याचबरोबर, आगामी काळात आणले जाणारे ‘मतदारसंघ पुनर्रचना विधेयक’ संसदेत टिकणार नाही आणि ते पडेल, असा दावाही संजय राऊत यांनी यावेळी केला. हेही वाचा.. राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार:नाशिक, जळगावसह मराठवाड्यातील 7 जिल्ह्यांना यलो अलर्ट, कोकण-मध्य महाराष्ट्रात हलक्या सरी राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने तापमानात आणि उकाड्यात वाढ झाली होती. मात्र, आता पुन्हा एकदा हवामानात मोठा बदल होत असून, राज्याच्या अनेक भागांत पावसाचा जोर वाढण्याची चिन्हे आहेत. भारतीय हवामान विभागाने आज (८ ऑगस्ट) नाशिक आणि जळगावसह मराठवाड्यातील ७ जिल्ह्यांना विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा इशारा देत ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *