![]()
यंदाच्या दमदार पावसामुळे जायकवाडी धरणात समाधानकारक जलसाठा निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर शनिवारी जायकवाडी धरणाच्या जलसाठ्याचे जलपूजन करण्यात आले. पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या उपस्थितीत झालेल्या या जलपूजन सोहळ्याला लोकप्रतिनिधी तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांची मोठी उपस्थिती होती. यावेळी आमदार विलास भुमरे, विभागीय आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी, महापौर समीर राजूरकर, माजी महापौर नंदकुमार घोडेले, नगरसेविका हर्षदा शिरसाट, भूषण कावसानकर, अधीक्षक अभियंता राजेंद्र धोडपकर, कार्यकारी अभियंता गणेश हासे, तहसीलदार ज्योती पवार, मनोरमा गायकवाड, राजेश कांबळे आदी उपस्थित होते. जायकवाडी धरण हे मराठवाड्याच्या सिंचन, पिण्याचे पाणी आणि औद्योगिक गरजांसाठी अत्यंत महत्त्वाचे जलस्रोत आहे. यंदा गोदावरी खोऱ्यात झालेल्या दमदार पावसामुळे धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली आहे. त्यामुळे मराठवाड्यातील शेतकरी आणि नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. जलपूजनानिमित्त धरण परिसरात उपस्थित मान्यवरांनी जायकवाडीच्या जलसाठ्याकडे पाहून समाधान व्यक्त केले. आगामी काळात या पाण्याचे काटेकोर नियोजन करून शेतीसह पिण्याच्या पाण्याची गरज भागविणे आणि उपलब्ध जलसाठ्याचा अधिकाधिक लाभ नागरिकांना मिळवून देण्यावर भर देण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली. जायकवाडीतील यंदाचा मुबलक जलसाठा हा मराठवाड्यासाठी दिलासादायक ठरणार असून, या पाण्यामुळे आगामी रब्बी हंगामासह विविध पाणीवापराच्या गरजांना मोठा आधार मिळणार आहे.
Source link
जायकवाडी जलाशयाचे जलपूजन:पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते पाणीसमृद्धीचे स्वागत