Headlines

पुणे ग्रामीण पोलिसांचे कोल्हापूर मेळाव्यात वर्चस्व:तब्बल 57 पदकांसह जनरल चॅम्पियनशिप पटकावली




कोल्हापूर येथे झालेल्या २१ व्या परिक्षेत्रीय पोलीस कर्तव्य मेळावा २०२६ मध्ये पुणे ग्रामीण पोलिसांनी जनरल चॅम्पियनशिप जिंकली. त्यांनी एकूण ५७ पदके मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले. या मेळाव्यात पुणे ग्रामीणसह सातारा, सांगली, सोलापूर ग्रामीण आणि कोल्हापूर जिल्ह्यातील पोलीस अधिकारी व अंमलदार सहभागी झाले होते. वैज्ञानिक पद्धतीने तपास, पोलीस छायाचित्रण, पोलीस व्हिडिओचित्रण, घातपातविरोधी तपासणी, संगणक जागरूकता आणि श्वान पथक अशा सहा प्रमुख प्रकारांमध्ये एकूण १९ उपप्रकारांच्या स्पर्धा घेण्यात आल्या. पुणे ग्रामीणचे पोलीस निरीक्षक विनय बहिर यांनी न्यायवैद्यक विज्ञानातील वैद्यकीय-कायदेशीर तोंडी स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले. सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल कदम यांनी वैज्ञानिक पद्धतीने तपास, बोटांचे ठसे आणि पोलीस छायाचित्रणात दोन सुवर्णपदकांसह वैद्यकीय-कायदेशीर तोंडी स्पर्धेत कांस्यपदक पटकावले. सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन शिंदे यांनी वैज्ञानिक तपासाच्या लेखी स्पर्धेत कांस्यपदक जिंकले. पोलीस उपनिरीक्षक महेश गायकवाड यांनी वैज्ञानिक तपासातील प्रयोगशाळा व पॅकिंग स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले, तर पोलीस शिपाई स्वप्नील गाडेकर यांनी निरीक्षण स्पर्धेत कांस्यपदक पटकावले. छायाचित्रकार आर. डी. शिंदे यांनी पोलीस छायाचित्रणात सुवर्णपदक जिंकले. तसेच सहाय्यक फौजदार राजू जडार आणि पोलीस शिपाई यश कठाळे यांनी घातपातविरोधी तपासणीतील विविध प्रकारांत सुवर्णपदके मिळवली. संगणक जागरूकता स्पर्धेत पोलीस शिपाई तोफिक शेख आणि कोंडू सावंत यांनी चमकदार कामगिरी केली. पुणे ग्रामीण पथकाने एकूण ४० सुवर्ण, ९ रौप्य आणि ८ कांस्य अशी ५७ पदके मिळवत जनरल चॅम्पियनशिपवर आपले नाव कोरले. या यशाबद्दल पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विजेत्या अधिकारी व अंमलदारांचे अभिनंदन केले. तपासातील वैज्ञानिक कौशल्य, तांत्रिक क्षमता आणि व्यावसायिक दक्षता या कामगिरीतून प्रकट झाली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *