![]()
“महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोठा त्रास होत आहे आणि याच त्रासाची तक्रार करण्यासाठी शिंदे हे दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीला गेले होते,” असा खळबळजनक दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी केला आहे. आज पत्रकार परिषदेत बोलताना पटोले यांनी शेतकरी आत्महत्या, बोगस बियाण्यांचे रॅकेट, ‘जेन झी’ आंदोलन, राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत वाद आणि भाजपच्या आरक्षण धोरणावर सडकून टीका केली. शिंदे-फडणवीस वाद आणि दिल्लीवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घेतलेल्या भेटीवर भाष्य करताना पटोले म्हणाले, “कालच मी कोल्हापूरमध्ये सांगितले होते की, एकनाथ शिंदेंना फडणवीसांचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. महायुतीत कुरघोडीचे राजकारण सुरू आहे आणि फडणवीसांच्या त्रासाची तक्रार घेऊनच शिंदे दिल्लीत मोदींच्या दरबारी गेले होते. पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांच्या दौऱ्यांमुळे महाराष्ट्राला काही मिळत नाही, उलट महाराष्ट्राच्या शासकीय मालमत्ता आणि प्रकल्प केंद्रातील मित्रांच्या घशात घालण्याचे काम सुरू आहे.” बोगस बियाणे आणि खतांमुळे शेतकऱ्यांची लूट राज्यातील कृषी संकटावर संताप व्यक्त करत पटोले म्हणाले, “सध्या शेतीचा हंगाम सुरू असताना राज्यभरात खतांचा आणि बियाण्यांचा प्रचंड तुटवडा आहे. बाजारात बोगस बियाणे आणि बनावट खते सर्रास विकली जात असून शेतकऱ्यांना लुटले जात आहे. अकोल्यातील घटनेवरून स्पष्ट झाले आहे की, सरकारच या बोगस कंपन्यांना पाठीशी घालत आहे. इतकेच काय तर शासकीय ‘महाबीज’ महामंडळसुद्धा बोगस बियाणे विकत असल्याचे उघड झाले आहे. या भ्रष्ट कारभारामुळे आज देशात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रात होत आहेत.” ‘गुंगी गुडिया’ वक्तव्यावर पडदा काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावर केलेल्या ‘गुंगी गुडिया’ या वक्तव्यावर विचारले असता पटोले म्हणाले, “हर्षवर्धन सपकाळ यांनी याबाबत अप्रत्यक्षपणे खेद व्यक्त केला आहे. त्यामुळे आता तो विषय संपला आहे. विरोधकांनी अशा मुद्द्यांवर वेळ घालवण्यापेक्षा राज्यातील शेतकऱ्यांच्या आणि जनतेच्या मूळ प्रश्नांकडे लक्ष दिले पाहिजे.” जेन झी आंदोलन आणि शिक्षण व्यवस्थेचा बट्ट्याबोळ तरुणांच्या ‘जेन झी’ आंदोलनावर बोलताना पटोले म्हणाले, “गेल्या 12 वर्षांत भाजप आणि संघाने मिळून देशातील शिक्षण व्यवस्था विकायला काढली आहे. सर्वसामान्यांची मुले दर्जेदार शिक्षण घेऊ शकत नाहीत आणि तरुणांच्या हाताला रोजगार नाही. बेरोजगारी शिगेला पोहोचल्यामुळेच तरुण रस्त्यावर उतरले आहेत. आंदोलनाच्या दबावामुळेच पंतप्रधानांना मध्यरात्री समाजमाध्यमांवर यावे लागले. हा देशातील बदलाचा मोठा संकेत आहे.” राष्ट्रवादीतील वाद आणि आरक्षणावरून भाजपवर टीका राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत धुसफूस आणि प्रशांत किशोर यांच्या भूमिकेवर ते म्हणाले, “प्रशांत किशोर पक्षांचे प्रमोशन करण्याचे टेंडर घेतात. राष्ट्रवादीतील तो त्यांचा अंतर्गत वाद असून काँग्रेसला त्यात पडण्याचे कारण नाही.” मराठा आणि ओबीसी आरक्षणावर बोलताना पटोले म्हणाले, “2014 पासून भाजप, देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांनी मराठा, ओबीसी, धनगर, बंजारा आणि गोवारी समाजाला आरक्षणाची खोटी आश्वासने दिली. आज केंद्रात आणि राज्यात त्यांचे सरकार असतानाही एकाही समाजाला न्याय मिळालेला नाही. केवळ जातीजातीत तेढ निर्माण करून मतांचे राजकारण केले जात आहे.” हेही वाचा… तुळजाभवानीच्या साक्षीने सांगतो, मराठ्यांवर अन्याय सुरू आहे: मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर थेट हल्लाबोल; 29 ऑगस्टच्या ‘आरपार’ आंदोलनाची हाक “आई तुळजाभवानीच्या पवित्र दरबारातून आणि साक्षीने सांगतो, सध्याच्या सरकारकडून मराठ्यांवर उघड अन्याय सुरू आहे. मराठ्यांच्या हक्काची कुणबी प्रमाणपत्रे रद्द करण्याचे मोठे षडयंत्र रचले जात आहे. मात्र, आता हा अन्याय सहन केला जाणार नाही. 29 ऑगस्टपासून अंतरवाली सराटीत सुरू होणारे आंदोलन हे मराठ्यांचे शेवटचे आणि निर्णायक आंदोलन असेल,” असा थेट आणि आक्रमक इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी
Source link
एकनाथ शिंदेंना फडणवीसांचा त्रास, त्याची तक्रार करायलाच ते मोदींकडे गेले!:नाना पटोलेंचा मोठा दावा; बोगस बियाणे- शेतकरी आत्महत्येवरून सरकारवर हल्लाबोल