![]()
“देशातील तरुणांना आणि विद्यार्थ्यांना भेटायला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे वेळ नाही, मात्र फुटून गेलेल्या गद्दार खासदारांना भेटायला त्यांच्याकडे वेळ आहे. गद्दारांना ‘मी पाठीशी आहे’ असे सांगून मोदींनी एक प्रकारे सर्वोच्च न्यायालयालाच धमकीवजा संदेश दिला आहे का?” असा थेट आणि खळबळजनक सवाल शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी देशातील सद्यस्थिती आणि पंतप्रधानांच्या भूमिकेवर तीव्र संताप व्यक्त केला. ‘इन्स्टाग्रामवरून सरकार चालवण्याची वेळ’ गेल्या दोन महिन्यांपासून जगभरात आणि देशात ‘झेनझी’ पिढीने सरकारला कसे गुडघ्यावर आणले आहे, याचा संदर्भ देत ठाकरे म्हणाले, “विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर लाठीचार्ज झाला, अत्याचार झाले, ज्यामुळे जालियानवाला बाग हत्याकांडाची आठवण आली. तरीही या विद्यार्थ्यांशी कुणीही संवाद साधत नाही. पंतप्रधान मोदी त्यांना भेटत नाहीत, मात्र रात्री इन्स्टाग्रामवर व्हिडिओ टाकतात. आता यांची इन्स्टाग्रामवरून सरकार चालवण्याची वेळ आली आहे. कोरोनाकाळात जेव्हा मी फेसबुक लाईव्ह करत होतो, तेव्हा हेच लोक मला ट्रोल करत होते.” ‘सुप्रीम कोर्टावर दबाव आणण्याचा प्रयत्न?’ काल पंतप्रधान मोदी आणि शिंदे गटाच्या खासदारांमध्ये झालेल्या भेटीवर उद्धव ठाकरे यांनी टीका केली. ते म्हणाले, “देशातल्या तरुणांना भेटायला यांना वेळ नाही, मात्र गद्दारांना भेटायला वेळ आहे. बंद दाराआड मोदींनी या खासदारांना सांगितले की, ‘भिऊ नका, मी तुमच्या पाठीशी आहे.’ मग हे वाक्य बंद दारातून बाहेर कसे आले? हा थेट सर्वोच्च न्यायालयाला किंवा सरकारला दिलेला धमकीवजा संदेश आहे का? याचा खुलासा झाला पाहिजे.” गद्दारीचा व्हायरस लोकशाहीचा जीव घेतोय ही लढाई आता केवळ शिवसेनेपुरती मर्यादित राहिलेली नाही, असे नमूद करत ठाकरे म्हणाले, “पंतप्रधानांनी अशा प्रकारे पाठिंबा देऊन भविष्यातील गद्दारांनाही एक चुकीचा संदेश दिला आहे. सध्या राजकारणात मतलबी वारे वाहत असून, हा गद्दारीचा व्हायरस आता लोकशाहीचा जीव घेत आहे. गद्दारांना आता कसले भय? माझ्या मनातील शंका आणि भीती मांडण्यासाठी मी आज समोर आलो आहे.” शिवसेना अपात्रता प्रकरणावर सूचक भाष्य गेल्या चार वर्षांपासून सुरू असलेल्या शिवसेनेच्या अपात्रता प्रकरणावर बोलणे मात्र ठाकरेंनी टाळले. “हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने मी त्यावर आता बोलणार नाही. मात्र, संविधानाप्रमाणेच याचा निकाल लागावा, अशी आमची अपेक्षा आहे,” असा विश्वास त्यांनी शेवटी व्यक्त केला. हेही वाचा.. न्यायालयावर दबाव आणण्याचा मोदींचा प्रयत्न:फुटीर खासदारांना भेटणं हा गुन्हा; संजय राऊतांचा पंतप्रधान मोदींवर गंभीर आरोप उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटातील खासदारांनी नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली. या भेटीवरून आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदी आणि भाजपवर टीका केली आहे. “पंतप्रधानांनी त्यांच्या निवासस्थानी गद्दारांसाठी ‘कॅटरिंग सर्व्हिस’ सुरू केली आहे,” असा टोला लगावतानाच, फुटीर खासदारांना पाठिंबा देऊन मोदी न्यायालयावर दबाव आणत असल्याचा गंभीर आरोप राऊत यांनी केला आहे. सविस्तर वाचा
Source link
गद्दारांना सांगताय 'भिऊ नका, मी पाठीशी आहे:हा थेट सुप्रीम कोर्टालाच धमकीवजा संदेश आहे का? उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान मोदींना सवाल