Headlines

नर्सी नामदेव येथ रविवारी परतवारीचा भक्तीसोहळा:5 लाख भाविक येण्याचा अंदाज, संस्थानकडून तयारी पूर्ण




संत नामदेव महाराजांचे जन्मस्थळ असलेल्या नर्सी नामदेव येथे रविवारी ता. ९ परतवारीचा भक्तीसोहळा अनुभवायला मिळणार आहे. परतवारी निमित्त संपूर्ण राज्यभरातून सुमारे ५ लाख भाविक येण्याचा अंदाज असून त्यानुसार संस्थानकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर येथे विठ्ठलाच्या दर्शनासाठी गेलेले भाविक आषाढी एकादशी नंतर पंधरा दिवसांनी येणाऱ्या कामिका एकादशीला परतवारीच्या दिवशी संत नामदेव महाराजांचे जन्मस्थळ असलेल्या नर्सी नामदेव येथे संत नामदेव महाराजांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी येतात. नर्सी येथे दर्शन घेतल्या शिवाय पंढरपूरची वारी पूर्ण होत नाही अशी अख्यायिका आहे. त्यामुळे मराठवाडा, विदर्भासह परिसरातील जिल्हयातून भाविक दर्शनासाठी येतात. त्यामुळे यावारीला परतवारी असे संबोधले जाते. दरम्यान, परतवारीच्या निमित्ताने येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेऊन संस्थानकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. भाविकांची पावसामध्ये गैरसोय होऊ नये यासाठी सहा पेक्षा अधिक वॉटरप्रुफ मंडप उभारण्यात आले आहे. मराठवाडा विदर्भातील दिंड्या दाखल होत आहेत. शनिवारी ता. ८ रात्री बारा वाजता महापूजा होणार आहे. यावेळी भिकाजी कदम, ओमप्रकाश हेडा, संस्थानचे उपाध्यक्ष भिकाजी किर्तनकार, भिकूलाल बाहेती, उपसरपंच ज्ञानेश्‍वर किर्तनकार यांच्यासह संस्थानच्या विश्‍वस्तांची उपस्थिती राहणार आहे. या ठिकाणी येणाऱ्या भाविकांची गर्दी लक्षात घेऊन महापुजेनंतर लगेचच मंदिर दर्शनासाठी खुले केले जाणार आहे. मंदिर २४ तास सुरु राहणार असून या कालावधीत सुमारे ५ लाख भाविक येण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. भाविकांसाठी ओमप्रकाश हेडा यांच्या वतीने १०० क्विंटल साबुदाना खिचडीचे वाटप केले जाणार आहे. या शिवाय नर्सी नामदेव येथे पायी येणाऱ्या भाविकांसाठी दानशूरांच्या मदतीने रस्त्यात ठिकठिकाणी चहा पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता दर्शनासाठी सुमारे ३ तासाचा कालावधी लागण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *