![]()
सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी खामगावातील पारधी-आदिवासी आश्रमशाळेत अमनोरा येस फाऊंडेशनने उभारलेल्या तीन क्रीडा संकुलांचे उद्घाटन केले. देशाला खऱ्या अर्थाने विश्वगुरू बनवण्यासाठी वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. भागवत म्हणाले की, आज देशभरात ज्यांना भटके-विमुक्त म्हटले जाते, तो समाज एकेकाळी ज्ञानी होता. आपले ज्ञान निरपेक्षपणे वाटण्यासाठी तो घराबाहेर पडला आणि काळाच्या ओघात भटका व वंचित बनला. ब्रिटिशांच्या काळात स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेतल्याने पारधी-आदिवासी समाजावर गुन्हेगार जमातीचा शिक्का मारण्यात आला, ज्यामुळे हा समाज मोठ्या प्रमाणात मागास राहिला. खामगाव येथे स्व. भय्यूजी महाराज यांच्या पुढाकारातून सुरू झालेल्या या आश्रमशाळेत अमनोरा येस फाऊंडेशनने अत्याधुनिक तीन क्रीडा संकुले व विविध सुविधा तयार केल्या आहेत. या सुविधांच्या उद्घाटनावेळी राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके, कामगार मंत्री आकाश फुंडकर, सिटी कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक अनिरुद्ध देशपांडे आणि श्री सद्गुरू धार्मिक एवं पारमार्थिक ट्रस्ट, इंदूरच्या विश्वस्त डॉ. आयुषी देशमुख आदी उपस्थित होते. यावेळी डॉ. मोहन भागवत यांनी अमनोरा येस फाऊंडेशनच्या सहकार्याने आश्रमशाळेत केलेल्या विविध विकासकामांची पाहणी केली. त्यांनी शाळेतील अत्याधुनिक खेळाची मैदाने, मुलांसाठीची भोजनशाळा, विद्यार्थ्यांनी तयार केलेली परसबाग आणि वसतिगृहाची पाहणी केली. भागवत यांनी पुढे सांगितले की, एकेकाळी भारताचा समाज पूर्णपणे संघटित होता, परंतु परकीय आक्रमणामुळे तो गुलाम बनून विघटित झाला. यातूनच समाजात वंचित घटकांची संख्या वाढली. तरीही या घटकांनी कधीही पारतंत्र्य स्वीकारले नाही आणि ते स्वातंत्र्यासाठी संघर्ष करत राहिले. अनिरुद्ध देशपांडे यांनी सांगितले की, डॉ. मोहन भागवत यांच्या सूचनेनुसारच अमनोरा येस फाऊंडेशन या शाळेच्या विकासासाठी कार्यरत झाली. आज पारधी आदिवासी समाजातील मुले-मुली प्रगती आणि स्वयंपूर्णतेच्या दिशेने वाटचाल करत आहेत, हा आमच्यासाठी कृतज्ञतेचा क्षण आहे.
Source link
मोहन भागवत यांच्या हस्ते खामगावात क्रीडा संकुलांचे उद्घाटन:वंचितांना मुख्य प्रवाहात आणणे देशाला विश्वगुरू बनवण्यासाठी गरजेचे: सरसंघचालक