![]()
साखर उद्योगाकडे केवळ साखर उत्पादन करणारा उद्योग म्हणून न पाहता, तो ‘मल्टीप्रॉडक्ट बायोमास रिसोर्स’ म्हणून विकसित करण्याची गरज आहे. इथेनॉल, बायोगॅस, बायो-सीएनजी यांसारख्या मूल्यवर्धित उत्पादनांद्वारे उद्योगाची आर्थिक व्यवहार्यता वाढवणे आवश्यक आहे. त्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि कार्यक्षमता वाढवण्यावर भर द्यावा लागेल, असे प्रतिपादन राज्याचे माजी गृह व अर्थमंत्री जयंत पाटील यांनी केले. ‘डीएसटीए’चे तंत्रज्ञान, संशोधन आणि मार्गदर्शन साखर उद्योगाच्या प्रगतीमध्ये महत्त्वाचे ठरले आहे, असेही पाटील यांनी नमूद केले. जयंत पाटील हे दी डेक्कन शुगर टेक्नॉलॉजीज् असोसिएशनच्या (डीएसटीए) ७१व्या वार्षिक अधिवेशनात आणि साखर प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. सेनापती बापट रस्त्यावरील हॉटेल जेडब्ल्यू मॅरियट येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी माजी मंत्री राजेश टोपे व दिलीप देशमुख, राज्याचे साखर आयुक्त डॉ. संजय कोलते, माजी आयएएस अधिकारी डॉ. शेखर गायकवाड, कर्नाटकचे माजी मंत्री श्रीमंत पाटील, दी वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशनचे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे, दी साऊथ इंडियन शुगरकेन अँड शुगर टेक्नॉलॉजी असोसिएशनचे अध्यक्ष आर. व्ही. कुंभार, ‘डीएसटीए’चे अध्यक्ष सोहन शिरगावकर आणि उपाध्यक्ष एस. डी. बोखारे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या अधिवेशनात साखर उद्योगातील उल्लेखनीय योगदानाबद्दल विविध पुरस्कारांनी मान्यवरांचा गौरव करण्यात आला. ‘साखर उद्योग गौरव पुरस्कार’ एस. एस. इंजिनिअर्सचे चेअरमन एस. बी. भड, माजी मंत्री राजेश टोपे, गुजरात साखर संघाचे मानसिंहभाई पटेल, डॉ. सुरेश भोसले आणि कर्नाटकचे आमदार श्रीमंत पाटील यांना प्रदान करण्यात आला. ‘उत्कृष्ट साखर कारखाना पुरस्कार’ गोदावरी बायोरिफायनरी लिमिटेड, विलास सहकारी साखर कारखाना, जरंडेश्वर शुगर मिल्स प्रायव्हेट लिमिटेड आणि विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा सहकारी साखर कारखाना यांना देण्यात आला. जयंत पाटील यांनी यावेळी साखर उद्योगासमोरील आव्हानांवरही प्रकाश टाकला. बाजारातील चढ-उतार, ग्राहकांच्या बदलत्या अपेक्षा आणि वाढती किंमत स्पर्धा ही प्रमुख आव्हाने आहेत. पूर्वी साखर कारखाने सहा महिने चालत असत, परंतु आता अनेक कारखाने केवळ तीन महिन्यांच्या हंगामावर अवलंबून आहेत, ज्यामुळे त्यांची आर्थिक व्यवहार्यता कमी होत आहे. जगातील अनेक देशांतील साखर उद्योग आधुनिक होत असताना, भारतीय उद्योगानेही बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेणे गरजेचे आहे. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये सुरू असलेल्या संशोधनाचा प्रत्यक्ष कारखान्यांमध्ये वापर वाढवण्याची तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), प्रेडिक्टिव्ह मेंटेनन्स, आधुनिक बॉयलर तंत्रज्ञान आणि डिजिटल मॉनिटरिंगचा वापर वाढवण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
Source link
साखर उद्योग 'मल्टीप्रॉडक्ट बायोमास रिसोर्स' म्हणून विकसित व्हावा:जयंत पाटील यांचे 'डीएसटीए' अधिवेशनात आवाहन