Headlines

नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना 2 लाखांच्या अनुदानाची मागणी:मोर्शीत भाकप, काँग्रेसच्या नेतृत्वात मुख्यमंत्र्यांना निवेदन




मोर्शी येथे भारतीय कम्युनिस्ट पक्ष (भाकप) आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी नियमित कर्जफेड करणाऱ्यांना २ लाख रुपयांचे प्रोत्साहन अनुदान देण्याची मागणी केली आहे. या मागणीसाठी तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करण्यात आले. राज्य शासनाने नुकतीच कर्जबाजारी शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना जाहीर केली आहे. त्याचवेळी नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रक्कम देण्याचे सूतोवाचही केले होते. ही प्रोत्साहन राशी कर्जमुक्तीच्या रकमेइतकीच, म्हणजेच दोन लाख रुपये असावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. या मागणीच्या समर्थनार्थ महाराष्ट्र राज्य किसान सभा, भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि मोर्शी तालुका काँग्रेस कमिटीच्या कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयाच्या आवारात निदर्शने केली. त्यानंतर त्यांनी तहसीलदारांची भेट घेऊन मुख्यमंत्र्यांसाठी निवेदन सादर केले. अमरावती जिल्ह्यासह राज्यभरातील शेतकरी नैसर्गिक आपत्ती, वाढता उत्पादन खर्च आणि शेतीमालाला योग्य हमीभाव न मिळाल्याने आर्थिक संकटात आहेत. अशा परिस्थितीत, प्रामाणिकपणे वेळेवर पीककर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांची प्रोत्साहन रक्कम मिळणे आवश्यक आहे, असे निवेदनात म्हटले आहे. भविष्यात या मागणीसाठी राज्यव्यापी आंदोलन उभारण्याचा इशाराही देण्यात आला आहे. या निवेदनात, नियमित कर्जफेड करणाऱ्या प्रत्येक पात्र शेतकऱ्यास दोन लाख रुपयांचे प्रोत्साहन अनुदान देऊन त्यांच्यासाठी स्वतंत्र प्रोत्साहन योजना सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच, भविष्यात कर्जपुरवठ्यासाठी अशा शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यात यावे आणि त्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी शासनाने त्वरित ठोस निर्णय घ्यावा, असेही नमूद केले आहे. यावेळी किसान सभेचे संजय मंगळे, काँग्रेसचे प्रदेश सचिव विपुल भडांगे, सूरज अवचार, नरेंद्र फसाटे, महादेव मानकर, किशोर ऊमरकर, अतुल खोडस्कर, राहुल मंगळे, राहुल भोजने, प्रकाश नवले, जहीर खान, संजय आपकाजे, इकबाल खान, जियाउद्दीन बेग, शहेजाद, अन्सार कुरेशी, धीरज भोजने, पुण्यवर्धन राऊत, रुपेश बाखडे, मंगेश राऊत यांच्यासह भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि मोर्शी तालुका काँग्रेस कमिटीचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *