Headlines

मनोज जरांगेंना आभाळातून ज्ञान प्राप्त झालंय:दाढी नसली तरी सरकार त्यांची दाढी कुरवाळेल, विजय वडेट्टीवारांचा घणाघात




काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी आज पत्रकार परिषद घेत राज्य सरकार, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि राज ठाकरे यांच्या दौऱ्यासह विविध मुद्द्यांवर चौफेर फटकेबाजी केली. राज्यात भाजप आणि शिवसेनेत मोठे शीतयुद्ध सुरू असल्याचा दावा करत त्यांनी सरकारवर निशाणा साधला, तर दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांना ‘आभाळातून ज्ञान’ प्राप्त झाल्याचा टोला लगावला. “कमिशनखोरीमुळे रस्त्यांची चाळण” राज्यातील रस्त्यांच्या दुर्दशेवरून आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कोकण दौऱ्यावरून त्यांनी सरकारला धारेवर धरले. “मुंबई-गोवा महामार्ग नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. आता राज ठाकरे या महामार्गाची पाहणी करणार आहेत. जर ते तिथे गेले, तर त्यांना नक्कीच ती भयंकर परिस्थिती दिसेल. रस्त्यांची जी काही दुर्दशा झाली आहे, ती केवळ ‘कमिशनखोरी’मुळे झाली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात रस्त्यांची चाळण झाली असून मुख्यमंत्र्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे,” अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली. आरएसएसच्या कार्यक्रमातील अंबादास दानवेंच्या हजेरीवर सूचक विधान अंबादास दानवे यांच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमातील हजेरीबाबत बोलताना वडेट्टीवार म्हणाले, “सरसंघचालक मोहन भागवत यांच्या कार्यक्रमाला कुणी हजेरी लावत असेल, तर तो राजकारण कुठल्या दिशेने जात आहे याचा सूचक इशारा असू शकतो. ही हजेरी वैयक्तिक आहे की त्यांना खरोखरच त्यांच्यासोबत जायचे आहे, याचा खुलासा संबंधित पक्षानेच करावा. आम्हाला त्या पडायचे नाही.” “जरांगेंना आभाळातून ज्ञान, त्यांना दाढी नसली तरी सरकार दाढी कुरवाळेल” या पत्रकार परिषदेत वडेट्टीवार यांनी सर्वाधिक आक्रमक भूमिका मनोज जरांगे पाटील यांच्यावर घेतली. ते म्हणाले, “मनोज जरांगे यांना पुस्तकातून नाही, तर थेट आभाळातून ज्ञान आले आहे. जर त्यांच्याकडे पुस्तकी ज्ञान असते, तर ते कायद्याच्या भाषेत बोलले असते. आभाळातून ज्ञान आल्यामुळेच ते कोणत्याही भाषेत बोलतात आणि धमक्या देतात. केवळ समाजाची आणि लोकप्रियता मिळवण्यासाठी हे सर्व चालले आहे. या पोरांच्या आयुष्याशी खेळणे आता थांबवले पाहिजे.” ओबीसी आरक्षणाबाबत स्पष्ट भूमिका मांडताना ते म्हणाले, “ओबीसींना संविधानातून आरक्षण मिळाले आहे. त्यामुळे कुणबी प्रमाणपत्रासाठी १९६० पूर्वीचे पुरावे आवश्यकच आहेत. जर पुरावे नसतील, तर कुणालाही कुठलेही प्रमाणपत्र देता येत नाही, हे साधे गणित आहे. जर जरांगे पाटील हे साधे गणित मानायला तयार असतील, तर सरकारचे मंत्री पुन्हा त्यांना भेटायला जातील.” शेवटी सरकारला टोला लगावताना ते म्हणाले, जरांगे पाटील यांना दाढी नाहीये, पण तरीही काही मंत्री जाऊन त्यांची दाढी कुरवाळतील. भाजप-शिवसेनेत शीतयुद्ध सुरू राज्यातील सत्ताधाऱ्यांमधील विसंवादावर बोलताना वडेट्टीवार म्हणाले, “सध्या राज्यात भाजप आणि शिवसेना यांच्यात प्रचंड प्रमाणात शीतयुद्ध सुरू आहे. मंत्री अब्दुल सत्तार यांनी नुकतेच ‘भाजपने आमची मुंडकी छाटली’ असे वक्तव्य केले होते. यावरूनच हे स्पष्ट होते की ते एकमेकांवर कुरघोडी करत आहेत.” हेही वाचा.. जरांगेंच्या आंदोलनामागे प्रसाद लाड, त्यांनीच पैसा पुरवला:मुख्यमंत्र्यांचा बाप काढला तेव्हा लाड गप्प का? लक्ष्मण हाकेंचा सवाल मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामागे भाजप आमदार प्रसाद लाड हेच असून त्यांनीच हे वातावरण तापवले आहे, असा खळबळजनक दावा ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केला आहे. प्रसाद लाड यांनीच मनोज जरांगे यांना पैसे पुरवले आहेत, असा थेट आरोप करत त्यांनी लाड यांच्यावर आक्रमक हल्लाबोल केला. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *