![]()
गेल्या काही दिवसांपासून ग्रामीण भागात चोर आले…चोर आले…अशा अफवा सोशल मीडियावर आणि व्हॉट्सॲप या माध्यमातून पसरवल्या जात असून या पार्श्वभूमीवर वलगाव पोलिस स्टेशनतर्फे जनजागृती व समन्वय बैठक पार पडली. बैठकीत गावामध्ये शांतता व कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. चोर आले अशा दिशाभूल करणाऱ्या अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये, कोणतीही माहिती पडताळणीशिवाय सोशल मीडियावर किंवा व्हॉट्सअॅप वर पुढे पाठवू नये, असे आवाहन केले. यावेळी वरिष्ठ पोलिस निरीक्षक रिता उईके, सहायक पोलिस निरीक्षक अशोक शिर्के, समन्वयन पोलिस हेड कॉन्स्टेबल निलेश घाटे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी उईके यांनी नागरिकांना संबोधित करताना सांगितले की, कोणतीही संशयास्पद व्यक्ती अथवा हालचाल आढळल्यास स्वतः कायदा हातात न घेता तत्काळ वलगाव पोलिस स्टेशन किंवा डायल ११२ वर संपर्क साधावा. अफवा पसरवणे अथवा खोटी माहिती प्रसारित करणे हा कायद्याने दंडनीय गुन्हा असून अशा प्रकारांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. बैठकीत सहायक पोलिस निरीक्षक अशोक शिर्के यांनीही मार्गदर्शन करून ग्रामपातळीवर सतर्कता वाढवणे, ग्राम सुरक्षा दल सक्रिय ठेवणे आणि पोलिसांशी सातत्याने संपर्क ठेवण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमाचे समन्वयन पोलिस हेड कॉन्स्टेबल निलेश घाटे यांनी केले. उपस्थितांनीही गावांमध्ये अफवा रोखण्यासाठी जनजागृती करण्यास तसेच पोलिसांना सहकार्य करण्याची ग्वाही दिली. यावेळी पोलिसांनी सुरक्षित समाज घडवा हा संदेश देत सुरक्षित वलगाव आणि सर्वांनी एकत्रितपणे सहकार्य करण्याचे आवाहन केले.
Source link
सुरक्षित समाजासाठी अफवांवर भरवसा ठेवू नका; सहकार्य करा:अफवांच्या पार्श्वभूमीवर वलगाव पोलिस स्टेशनतर्फे जनजागृती