![]()
वसमत येथे देवदर्शनासाठी जाणाऱ्या महिलेस पाकिट पडल्याचे भासवून त्यांना बाजूला नेत त्यांच्या अंगावरील दागिने पळविणाऱ्या लातुर जिल्हयातील शिरूर ताजबंद येथील एका भामट्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी ता. ९ अटक केली असून त्याच्याकडून चोरलेला मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसमत तालुक्यातील पारवा येथील शांताबाई कदम ह्या बुधवारी ता. ५ वसमत येथे देवदर्शनासाठी आल्या होत्या. यावेळी दोन भामटे त्यांच्या जवळ आले. त्यांनी त्यांचे पाकिट हरविल्याचे नाटक करून शांताबाई यांच्याशी संवाद साधला. त्यानंतर त्यांना बाजूला नेत त्यांच्या कानातील सहा ग्राम वजनाच्या सोन्याच्या काड्या व हातातील तीस तोळे वजनाचे चांदीचे कडे भामट्यांनी पळविले. भर दिवसा घडलेल्या या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणी वसमत शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान, भामट्यांच्या शोधासाठी पोलिस अधिक्षक श्रेणिक लोढा, अप्पर पोलिस अधिक्षक कमलेश मीना, गुन्हे शाखेचे निरीक्षक मोहन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक माधव जिव्हारे, जमादार शिवाजी जालमीरे, किशोर सावंत, ज्ञानेश्वर गोरे, हरिभाऊ गुंजकर, शंकर हराळ यांचे पथक स्थापन केले होते. या पथकाने रविवारी ता. ९ वसमत येथे पाहणी केली. त्यानंतर अधिक माहिती घेतली. गणेश वाघमारे (रा. शिरुर ताजबंद जि. लातुर) याच्यासह अन्य एकाने हा प्रकार केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून पोलिसांच्या पथकाने वसमत येथूनच गणेश यास ताब्यात घेऊन त्याची अधिक चौकशी केली असता त्याने एका साथीदारासह गुन्हयाची कबुली दिली. पोलिसांनी गणेश याच्याकडून चोरून नेलेले दागिने जप्त करून त्याला वसमत शहर पोलिसांच्या हवाली केले आहे. या प्रकरणात अन्य एकाचा शोध सुरु आहे. त्याच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
Source link
वसमतमध्ये वृद्ध महिलेला फसवून सोने-चांदी लुटणारा जेरबंद:स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी, एकाचा शोध सुरू