![]()
नांदगाव खंडेश्वर तालुक्यात साखळी नदीवर पूल बांधण्याची आणि धामक ते अमरावती मार्गावर नियमित बससेवा सुरू करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. अलीकडेच झालेल्या अतिवृष्टीमुळे नदीला पूर येऊन दळणवळण विस्कळीत झाले होते. या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिकांनी लोकप्रतिनिधींकडे धाव घेतली आहे. या मागणीनुसार, खासदार अमर काळे यांनी दिल्लीत केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना निवेदन सादर केले आहे. पुलाच्या बांधकामासाठी केंद्रीय रस्ते निधी (CRF) अंतर्गत निधी मंजूर करण्याची मागणी त्यांनी केली. नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीत नांदगाव (खंडेश्वर) तालुक्यात एका दिवसात २९६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती, ज्यामुळे मंगरूळ (चव्हाळा) परिसरात सुमारे पाच ते सहा फूट पाणी साचून जनजीवन विस्कळीत झाले होते. खासदार अमर काळे यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी केली असता, साखळी नदीवर पूल नसल्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात उद्भवणाऱ्या गंभीर अडचणींची माहिती त्यांना मिळाली. साखळी नदीच्या एका बाजूस अमरावती तर दुसऱ्या बाजूस यवतमाळ जिल्हा आहे. मंगरूळ (चव्हाळा) येथील अनेक शेतकऱ्यांची शेती नदीपलीकडे असल्याने त्यांना शेतीच्या कामांसाठी अडचणी येतात. तसेच धानोरा व परिसरातील गावांमध्ये जाण्यासाठी नागरिकांना ही नदी पार करावी लागते. पावसाळ्यात नदीला पूर आल्याने दोन्ही जिल्ह्यांतील संपर्क तुटतो, वाहतूक ठप्प होते आणि विद्यार्थी, रुग्ण व नागरिकांना दैनंदिन प्रवासात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे नदीवर पूल बांधणे अत्यंत आवश्यक असल्याचे पाहणीदरम्यान समोर आले. या अडचणीची दखल घेत खासदार महोदयांनी केंद्रीय मंत्री गडकरी यांना निवेदन देऊन पुलाची मागणी केली आहे. दुसरीकडे, याच तालुक्यातील नागरिकांनी आमदार प्रतापदादा अडसड यांची भेट घेऊन अमरावती-धामक एसटी बसफेरीची मागणी केली. धामक तसेच परिसरातील विद्यार्थी, शेतकरी, व्यापारी आणि नागरिकांना अमरावतीत ये-जा करण्यासाठी सध्या मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे अमरावती–नांदगाव खंडेश्वर–शिवनी–शिंगणापूर–पिंपरी कलगा–येवती–धामक या मार्गावर नियमित बसफेऱ्या सुरू करण्याची मागणी करण्यात आली. आमदार प्रतापदादा अडसड यांनी या मागणीची तातडीने दखल घेत अमरावती आगार व्यवस्थापकांना तत्काळ कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. आमदारांना निवेदन देताना भाजपचे तालुकाध्यक्ष निकेत ठाकरे, पंकज मेटे, किसान मोर्चा आघाडीचे तालुकाध्यक्ष दिनेश सोनकुसरे, अल्पसंख्यांक सेलचे तालुकाध्यक्ष अजगर भाई, युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष अमोल इंगोले, संजय गांधी निराधार समिती सदस्य अक्षय मस्के तसेच युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष रुपेश उघडे उपस्थित होते.
Source link
साखळी नदीच्या पुरामुळे कहर; पुलाची मागणी:नांदगाव खंडेश्वरमध्ये धामक-अमरावती बससेवेसाठीही नागरिकांचे आमदारांना साकडे