Headlines

बुलढाणा जिल्ह्याचे नाव 'राजमाता जिजाऊनगर' होणार?:आमदार श्वेता महाले यांची मागणी, मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला कार्यवाहीचे निर्देश




बुलढाणा जिल्ह्याचे नामकरण करण्याची मागणी आता जोर धरू लागली असून, जिल्ह्याचे नाव बदलून ‘राजमाता जिजाऊनगर’ करावे, अशी अधिकृत मागणी भाजप आमदार श्वेता महाले यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र दिले असून, मुख्यमंत्र्यांनीही या पत्राची तात्काळ दखल घेत प्रशासनाला पुढील कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. या सकारात्मक प्रतिसादामुळे राजमाता जिजाऊंच्या नावाने बुलढाणा जिल्ह्याची नवी ओळख निर्माण होण्याच्या दिशेने हे एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. मातृतीर्थ सिंदखेड राजा ही राजमाता जिजाऊंची जन्मभूमी असल्याने, या भूमीला त्यांचे नाव देऊन तिचा सन्मान व्हावा, अशी भावना श्वेता महाले यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात व्यक्त केली आहे. बाल शिवबांच्या मनात हिंदवी स्वराज्याचे बीज पेरून छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या युगपुरुषाला घडवण्यात राजमाता जिजाऊंचे अतुलनीय योगदान आहे. त्यामुळे त्यांच्या जन्मभूमीचा आणि असंख्य शिवप्रेमींच्या भावनांचा आदर करण्यासाठी बुलढाणा जिल्ह्याचे ‘राजमाता जिजाऊनगर’ असे नामकरण करणे अत्यंत सार्थ ठरेल, असे त्यांनी आपल्या निवेदनात स्पष्ट केले आहे. सिंदखेड राजा हे ठिकाण केवळ बुलढाणा जिल्ह्यासाठीच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाचे आणि प्रेरणास्थान आहे. त्यामुळे राजमाता जिजाऊंच्या कार्याचा आणि त्यांच्या ऐतिहासिक योगदानाचा गौरव म्हणून या जिल्ह्याचे नाव बदलणे गरजेचे असल्याचे मत अनेक शिवप्रेमी आणि स्थानिक नागरिकांकडूनही व्यक्त केले जात आहे. आमदार श्वेता महाले यांच्या या मागणीला आता चांगलाच जोर मिळत असून, नागरिकांमधूनही या प्रस्तावाला पाठिंबा दिला जात आहे. दरम्यान, याआधी राज्य सरकारने ऐतिहासिक संदर्भ आणि जनभावना लक्षात घेऊन काही शहरांची नावे बदलली आहेत. यामध्ये उस्मानाबाद जिल्ह्याचे ‘धाराशिव’ आणि औरंगाबादचे ‘छत्रपती संभाजीनगर’ असे नामकरण करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर आता बुलढाणा जिल्ह्याचे नाव बदलण्याच्या मागणीने वेग घेतला आहे. मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला कार्यवाहीचे निर्देश दिल्याने, लवकरच बुलढाणा जिल्ह्याला ‘राजमाता जिजाऊनगर’ अशी नवी आणि ऐतिहासिक ओळख मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *