Headlines

श्री गाडगे महाराज मिशनचे उपाध्यक्ष बापूसाहेब देशमुख यांचे निधन:मुख्यमंत्र्यांसह मान्यवरांनी व्यक्त केला शोक




श्री संत गाडगे महाराज मिशनचे उपाध्यक्ष आणि संत गाडगेबाबा धर्मशाला ट्रस्ट मुंबई, नाशिक व अमरावतीचे विश्वस्त बापूसाहेब देशमुख यांचे रविवारी पहाटे २.३० वाजता नागरवाडी (ता. चांदूरबाजार) येथे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. त्यांच्या निधनामुळे राजकारण आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे. त्यांच्या पार्थिवावर रविवारी सायंकाळी श्री गाडगे महाराज गोरक्षण संस्था, मूर्तिजापूर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. निष्काम कर्मयोगी संत गाडगेबाबांच्या सेवा, त्याग आणि निष्काम कर्मयोगाचा वसा व वारसा त्यांनी आयुष्यभर जपला. बापूसाहेब देशमुख हे संत गाडगेबाबांच्या संकल्पनेतील नागरवाडी इंद्रभुवनाचे शिल्पकार म्हणून ओळखले जात होते. गरजू, वंचित, दुःखी आणि निराधारांच्या सेवेसाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले. त्यांच्या प्रेरणेने राज्यात ठिकठिकाणी गोरगरीब, दिव्यांग, बेघर आणि निराश्रित लोकांसाठी अन्नदान, वस्त्रदान, शालेय साहित्य वाटप, ब्लँकेट वाटप यांसारखे उपक्रम राबवले जात होते. तसेच, निराश्रितांसाठी आश्रमशाळा व वृद्धाश्रमही चालवले जात आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बापूसाहेब देशमुख यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले. ते म्हणाले, “त्यांच्या निधनाने संत गाडगेबाबांच्या विचारांची आणि सेवाकार्याची एक निष्ठावंत दीपज्योत हरपली आहे. नागरवाडी येथे त्यांनी उभे केलेले सेवाकार्य, समाजासाठी केलेला त्याग आणि मानवतेप्रती असलेली त्यांची निस्सीम बांधिलकी सदैव प्रेरणादायी राहील.” मुख्यमंत्र्यांव्यतिरिक्त आमदार संजय खोडके, अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक हरिभाऊ मोहोड आणि माजी पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्यासह अनेक मान्यवरांनीही बापूसाहेब देशमुख यांच्या निधनाबद्दल शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *