Headlines

वेगळ्या विदर्भासाठी दीक्षाभूमी ते संविधान चौक लाँग मार्च:31 डिसेंबर 2027 पर्यंत स्वतंत्र विदर्भ राज्याच्या निर्मितीचा निर्धार




स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीने क्रांती दिनाचे औचित्य साधून नागपुरात ‘विदर्भ निर्माण जनसंकल्प लाँग मार्च’ काढला. दीक्षाभूमी येथून सुरू झालेला हा मार्च संविधान चौकात पोहोचला, जिथे त्याचे जाहीर सभेत रूपांतर झाले. विदर्भातील ११ जिल्हे आणि १२० तालुक्यांतून आलेल्या हजारो विदर्भप्रेमींनी यात सहभाग घेतला. दीक्षाभूमीवरून संविधान चौकाकडे जाणाऱ्या या पदयात्रेदरम्यान ‘वेगळा विदर्भ झालाच पाहिजे’, ‘लेके रहेंगे विदर्भ राज’ आणि ‘आपले राज्य-विदर्भ राज्य’ अशा घोषणा देण्यात आल्या. या लाँग मार्चमुळे शहरातील प्रमुख चौकांमध्ये काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. या लाँग मार्चचे नेतृत्व विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अध्यक्ष व माजी आमदार ॲड. वामनराव चटप आणि प्रकाश पोहरे यांनी केले. त्यांच्यासोबत महिला आघाडीच्या अध्यक्षा प्रा. मंजुषा तिरपुडे, युवा आघाडी अध्यक्ष मुकेश मसुरकर, अरुण केदार, डॉ. पी. आर. राजपूत यांच्यासह विविध विभागांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. संविधान चौकात झालेल्या सभेत नेत्यांनी ‘मिशन २०२७’ अंतर्गत ३१ डिसेंबर २०२७ पर्यंत स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती झालीच पाहिजे, असा निर्धार व्यक्त केला. केंद्र आणि राज्य सरकारने विदर्भावरील अन्याय दूर करून त्वरित पावले उचलावीत, अशी मागणी यावेळी करण्यात आली. अन्यथा, हे आंदोलन अधिक तीव्र करून संपूर्ण विदर्भात निर्णायक जनलढा उभारला जाईल, असा थेट इशाराही देण्यात आला. या लाँग मार्चच्या माध्यमातून विदर्भवादी कार्यकर्त्यांनी स्वतंत्र राज्याचा लढा अधिक ताकदीने आणि एकजुटीने पुढे नेण्याचा ठाम निर्धार व्यक्त केला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *