![]()
राज्याच्या राजकारणात गेल्या काही महिन्यांत मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या आहेत. ठाकरेंच्या सहा खासदारांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर आता शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसही सत्तेसोबत जाणार असल्याची चर्चा रंगली आहे. याच पार्श्वभूमीवर, उद्या 10 ऑगस्ट रोजी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे सर्व खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. ही भेट विविध प्रश्नांसंदर्भात असल्याचे सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले असले तरी, दुसरीकडे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मुंबई ते कोल्हापूर असा एकाच विमानाने प्रवास केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या विमानप्रवासावर आणि राजकीय भेटींवर काँग्रेसचे नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटले की, राजकीय नेत्यांनी एकाच विमानात प्रवास करणे किंवा एकाच व्यासपीठावर बसणे ही आपली जुनी परंपरा आणि संस्कृती राहिलेली आहे. त्यामुळे असा प्रवास करणे काही चुकीचे नाही. मात्र, भाजपने सत्ता, पैसा आणि गुंडगिरीच्या माध्यमातून या राजकीय सभ्यपणाला कुठेतरी गालबोट लावले आहे. त्यामुळेच आता असा प्रवास झाल्यानंतर लगेच ज्या राजकीय शंका उपस्थित केल्या जातात, त्याला केवळ भारतीय जनता पक्षच जबाबदार आहे, असा आरोप सपकाळ यांनी केला. राष्ट्रवादीच्या खासदारांच्या पंतप्रधान भेटीसंदर्भात बोलताना सपकाळ म्हणाले की, पंतप्रधान हे संपूर्ण देशाचे असतात आणि त्यांनी सर्वांनाच भेटले पाहिजे. राज्याचे एखादे शिष्टमंडळ पंतप्रधानांना भेटायला जात असेल तर त्यात काहीही वावगे नाही. मात्र जे पंतप्रधान संसदेतच येत नाहीत, त्यांच्याकडून अशी अपेक्षा करणे चुकीचे आहे. तसे पाहिले तर, कोणाला भेटायचे असेल तर ती जाणाऱ्यांची आणि भेटणाऱ्यांची, अशा दोघांचीही मर्जी असते, असेही त्यांनी या भेटीच्या अनुषंगाने स्पष्ट केले. दरम्यान, मतदारसंघांच्या पुनर्रचनेच्या (डिलिमिटेशन) मुद्द्यावरूनही हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपवर जोरदार टीका केली. डिलिमिटेशन हा पूर्णपणे भारतीय जनता पक्षाचा कावा असून, हा निर्णय राष्ट्रविरोधी, देशविरोधी आणि संविधानाच्या विरोधात जाणारा आहे, असा गंभीर आरोप त्यांनी केला. त्यामुळे या निर्णयाच्या विरोधात सर्वांनी मिळून तीव्र विरोध दर्शवला पाहिजे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
Source link
जयंत पाटील-देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमान प्रवास:हर्षवर्धन सपकाळ यांची खोचक टीका, कॉंग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया काय?