Headlines

रेखाटनांच्या दुनियेतील 'अस्सल' शिल्पकार हरपला:ज्येष्ठ चित्रकार श्रीधर अंभोरे यांचे जालना येथे निधन




मराठी साहित्य आणि चित्रकलेच्या संगमावर आपल्या रेषांनी समृद्ध अन् जिवंत अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ चित्रकार व रेखाचित्रकार श्रीधर अंभोरे (वय 79) यांचे जालन्यात निधन झाले. त्यांच्या जाण्याने केवळ चित्रकला क्षेत्राचीच नव्हे, तर संपूर्ण मराठी साहित्यविश्वाची न भरून येणारी हानी झाली आहे. अंभोरे पोस्टातील सेवेतून निवृत्त झाले होते. त्यानंतर जालना येथील भावाकडे वास्तव्याला होते. त्यांच्या मागे महेंद्र व रवींद्र अंभोरे हे दोघे पुतणे, नातवंड व सुना असा परिवार आहे. आपल्या हातांमधील कुंचल्याने आणि मोजक्या रेषांनी भावनांचा महासागर कागदावर उतरवणाऱ्या या महान कलावंताच्या एक्झिटमुळे कलाक्षेत्रात शोककळा पसरली आहे. रेषांचे जादुगार आणि साहित्याचे ‘बोलके’ सोबती श्रीधर अंभोरे यांचे नाव मराठी ग्रंथविश्वात अत्यंत आदराने घेतले जाते. पुस्तकाच्या मुखपृष्ठापासून ते आतील मांडणीपर्यंत, आपल्या वैशिष्ट्यपूर्ण रेषांनी त्यांनी शेकडो पुस्तकांना एक नवी ओळख मिळवून दिली. अंभोरे यांचा जन्म अकोला जिल्ह्यातल्या चिखलगाव येथे 21 मार्च 1947 रोजी झाला. प्राथमिक शिक्षण गावात आणि माध्यमिक शिक्षण अकोला येथे झाले. त्यानंतर अहिल्यानगर येथे पोस्ट खात्यात ते नोकरीला लागले. त्यांनी मराठीतील तीनशेहून अधिक साहित्यकृतींचे मुखपृष्ठ रेखाटून दिले. ते या कामासाठी मानधनही घेत नसत. अनन्यसाधारण शैली अत्यंत साध्या, पण खोल अर्थ सांगणाऱ्या रेषा हे अंभोरे यांच्या चित्रशैलीचे मुख्य वैशिष्ट्य होते. दलित साहित्य, विद्रोही चळवळी आणि सामाजिक जाणिवांवर आधारित साहित्याला त्यांनी आपल्या चित्रांमधून एक धारदार आणि वास्तववादी चेहरा दिला. मराठीतील अनेक दिग्गज लेखकांच्या, कवींच्या कलाकृतींना अंभोरे यांच्या चित्रांचे पाठबळ लाभले. “चित्र बोलतात” या उक्तीचा प्रत्यय अंभोरे यांच्या प्रत्येक रेखाटनातून येत असे. जालन्यासारख्या ठिकाणी राहून त्यांनी आपले कलासाधनेचे व्रत अखंड चालू ठेवले. अनेक पुरस्कारांनी गौरव अंभोरे यांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले. त्यांना फाय फाउंडेशन पुरस्कार, पद्मश्री विखे पाटील फाउंडेशन पुरस्कार, अजिंठा पुरस्कार, पद्मश्री दया पवार पुरस्कार, साहित्य-माणिक उत्कृष्ठ मुखपृष्ठकार पुरस्कार, अ. भा. मायबोली मराठी साहित्य संघाचा ‘विदर्भ भूषण ‘ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. “रेषांना फक्त लांबी नसते, तर त्यांना भावना आणि आवाजही असतो, हे श्रीधर अंभोरे यांच्या चित्रांनी सातत्याने सिद्ध केले.” त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच साहित्यिक, कलाकार, सामाजिक कार्यकर्ते आणि चाहत्यांकडून तीव्र दुःख व्यक्त केले जात आहे. त्यांच्या जाण्याने मराठी चित्रांकन क्षेत्रातील एक सशक्त आणि अस्सल पर्व संपुष्टात आले आहे. कवी अशोक कोतवाल यांची फेसबुक पोस्ट कवी अशोक कोतवाल यांनी एका फेसबुक पोस्टच्या माध्यमातून श्रीधर अंभोर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. या पोस्टमधून श्रीधर अंभोरे यांचा एक आगळावेगळा परिचय आपल्याला होतो. ती पोस्ट जशीच्या तशी… रंग-रेषांचे जादूगार श्रीधर अंभोरे यांना भावपूर्ण श्रध्दांजली एखादा चित्रकार तुमच्या नावालाही चित्राचं रुप देऊ शकतो! हा अनुभव मला पुलकीत करणारा होता. माझ्या उमेदवारीच्या काळात श्रीधर अंभोरेंची कौतुकाची थाप जी माझ्या पाठीवर पडली ती आजतागायत तशीच होती. साधारणत: नव्वद आणि दोन हजारच्या दशकात मला भेटलेली माणसं अजूनही माझ्या संपर्कात आहेत… माझ्याशी जुळलेली आहेत हीच माझी खरी श्रीमंती आहे.नाहीतर अलीकडे माणसा-माणसांतील संबंध फार तकलादू झालेहेत.माणसं पटकन तुटतात.श्रीधर अंभोरे मला अहमदनगरच्या अ.भा.मराठी साहित्य संमेलनात भेटले नि पुढे आमचा पत्रव्यवहारही झाला. अंभोरेंचं अफाट वाचन आणि भटकंतीतून आलेलं अनुभवांचं प्रचंड भांडार मला प्रत्येक भेटीत सतत समृध्द करीत आलेलं आहे.एखाद्या खेळण्याला चाबी द्यावी अन त्यानं काहीवेळ वाजत रहावं तसा मी अंभोरेंच्या आत दडलेल्या अनुभवांना पुन्हा पुन्हा प्रश्नांची चाबी द्यायचो अन ते खुलत जायचे…बोलत जायचे.मग मी त्यांना तासंतासं ऐकत राहतो. अहमदनगरच्या पोस्ट ऑफिसमध्ये नोकरीला असताना फावल्या वेळात ते, कुत्री,डुकरं, गायी आणि भिकारी यांची रेखाटनं करीत असत.पोस्ट आॉफिसभध्ये आपल्या देशात पत्रं पाठविण्यासाठी रोज काही परदेशी माणसं (फॉरेनर) येत.त्यांनी एकदा अंभोरेंना कुत्र्यांची रेखाटनं काढताना बघीतलं.अंभोरेंकडे त्यांनी ती रेखाटनं मागीतली.त्यांना ती खूपच आवडली. मग रोजच कुत्र्यांची वेगवेगळी रेखाटनं घेण्यासाठी वेगवेगळ्या देशातली माणसं अंभोरेंकडे येऊ लागली.ही माणसं ती रेखाटनं आपल्या देशात मित्रांना नातेवाईकांना पाठवत असत. तिकडे ते लोक या चित्रांमध्ये रंग भरून अथवा तशीच फ्रेम करून आपल्या घरांमध्ये लावत.अंभोरेंची अशी शेकडो रेखाटनं जगातील पंधरा देशांमधील घरांमध्ये फ्रेम करुन लावलेली आहेत. ताडोबा, मेळघाटासह मध्यप्रदेश,आंध्र प्रदेश,केरळ, आणि कर्नाटकची जंगलं पालथी घालून श्रीधर अंभोरे तिथल्या आदिवासींमध्ये राहून येतात. तिथल्या झाडं-झुडूपांची चित्रं काढतात.शेणानं सारवलेली घरं,मातीनं पोचारलेल्या घरांच्या भिंतींवर गेरु किंवा चुन्यानं काढलेल्या चित्रांचा अभ्यास करतात. आदिवासींची लोककला, लोकसंस्कृती समजून घेतात.अबोलीची फुलं केसात माळलेल्या आदिवासी स्रियां,राजस्थाना‌त आणि मध्यप्रदेशात विहीरीवर पाणी भरायला गेलेल्या सुखदु:खाच्या गोष्टी करणार्‍या स्रियां यांची मालिकाच ते चितारतात. त्यांच्या चित्रांमध्ये चेहरा नसलेली,शरीर नसलेली,आक्रोश करणारी माणसं सतत येत राहतात.माणसांवरचा अन्याय, अत्याचार कोणता आणि कशाप्रकारचा असू शकतो याची त्यांनी हजारों रेखाटनं काढलेली आहेत… घनदाट जंगलात भटकत असताना चकव्यात दृष्टीभ्रम, बुद्धीभ्रम कसा होतो याचा अनुभव ते घेतात. कान्हा-केसळीच्या जंगलात पळसाच्या पानावर मध लावून मुंग्या खाणाऱ्या, मुंग्या विकणाऱ्या स्रियांना भेटून मुंग्या खाण्याचे फायदे जाणून घेतात.ते स्वत: मध लावलेल्या पळसाच्या पानावर मुंग्या घेऊन खातात.मुंग्या, साप-अजगर खाणार्‍या आदिवासींच्या घरांमध्ये राहून येतात. बिहार मधील राजगीरमध्ये बौध्दविहारात एका नव्वद वर्षे वयाच्या बौध्द भिक्कूसोबत काही दिवस घालवून जैन दर्शन,महावीर दर्शन यांची माहिती करून घेतात. वेरुळच्या लेण्यांमध्ये भटकत असताना एका सुंदर स्रीच्या शिल्पातील उघड्या स्तनांना खरोखरचे स्तन समजून लुचणार्‍या, एका भुकेल्या बाळाला ते बघतात आणि आई-बाळाच्या भावनिक पातळीवर वात्सल्याचं दर्शन घडवणारी,एक अप्रतिम चित्र-मालिकाच रेखाटतात.असे अनेक चक्रावून टाकणारे अनुभव ते घेतात… तरुण वयातील आपली कलंदर वृत्ती आणि झपाटलेल्या कृतीमुळे ते साक्षात मृत्यूचाही अनुभव घेतात.एकदा ते अहमदनगर जिल्हयातील मढी येथे देशभरातून येणार्‍या भटक्यांच्या यात्रेत,राज‌स्थानातून आलेल्या भटक्यांच्या एका सुंदर मुलीचे फोटो घेण्यासाठी आपला कॅमेरा सरसावतात आणि मग तिथले सगळे भटके लोक त्यांच्यावर तुटून पडतात. लाथा बुक्क्यांनी तोंडातून रक्त पडेपर्यंत अभोरेंना बदडून काढतात.मेला म्हणून जमिनीवर पडलेल्या अवस्थेत त्याना तसंच सोडून देतात.ही बहात्तर सालची घटना आहे.तेव्हाचे हे भटके लोक किती अज्ञानी असतील याची कल्पनाच केलेली बरी. आंध्र प्रदेशच्या जंगलात भटकत असताना तिथल्या आदिवासींच्या अज्ञानाचा फायदा घेऊन, त्यांच्यावर अन्याय अत्याचार करणार्‍या कंत्राटदारांना हातात चित्रांचं फाईल घेतलेले अंभोरे सरकारी अधिकारीच वाटतात. म्हणून ते आदिवासींना अंभोरेंविरुध्द काहीतरी चिथावतात.कुदळ- फावडे हातात घेऊन काही आदिवासी त्यांना मारण्याच्या तयारीत असतात. तेवढ्यात अंभोरेंना एका आदिवासी स्रीचं आठ-नऊ महिन्यांचं,उघडं-नागडं लेकरू पावसात थंडीनं कुडकुडताना दिसतं.तेव्हा ते त्याचं अंग पुसण्यासाठी व अंगावर पांघरण्यासाठी आपल्या जवळचा टॉवेल त्या लेकराच्या आईकडे फेकतात.ती आदिवासी बाई अंभोरेंना कुदळ-फावडं घेऊन मारायला आलेल्या आदिवासींना, तुम्ही हे काय करीत आहात म्हणून त्यांच्या भाषेत ओरडत राहते.तो चांगला माणूस आहे म्हणून सांगते.तो टॉवेल आणि फाईलमधील झाडांची चित्र अंभोरेंचा प्राण वाचवतात.अशा असंख्य अदभूत गोष्टी प्रत्यक्ष अंभोरेंच्या तोंडून ऐकताना आपल्या अंगावर अक्षरश: शहारे येतात.आपण अवाक होऊन जातो. अलीकडे आम्ही अधूनमधुन फोनवरच जास्त बोलायचो. आमच्या गप्पा रंगत जायच्या.श्रीधर अंभोरे चित्रकार म्हणून जितके ग्रेट होते तितकेच माणूस म्हणूनही श्रेष्ठ होते. या दिलदार मित्रास भावपूर्ण श्रद्धांजली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *