Headlines

अर्थपूर्ण व्यवहारांतून घोटाळ्यांवर पडदा!:देवेंद्र फडणवीसांकडून भ्रष्टाचाऱ्यांना पाठीशी घालण्याचे काम; राजू शेट्टींचा गंभीर आरोप




राज्यातील कृषी विभागात घोटाळ्यांची मालिकाच सुरू असून, वारंवार लेखी तक्रारी करूनही देवेंद्र फडणवीस यांच्याकडून कोणतीही कारवाई केली जात नाही. उलट भ्रष्टाचाऱ्यांना पाठीशी घालण्याचे काम केले जात आहे, असा अत्यंत गंभीर आणि खळबळजनक आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला आहे. कृषी विभागातील भ्रष्टाचाराचा पाढा वाचत राजू शेट्टी यांनी ‘एक्स’ (ट्विटर) वर एक पोस्ट करून राज्य सरकार, मुख्यमंत्री आणि कृषिमंत्र्यांवर थेट निशाणा साधला आहे. कृषी विभागातील घोटाळ्यांची यादीच केली जाहीर शेतकरी आधीच दुष्काळ, अतिवृष्टी आणि नापिकीमुळे संकटात असताना कृषी विभागात मात्र शेतकऱ्यांच्या योजनांमध्ये मोठा भ्रष्टाचार होत असल्याचे राजू शेट्टी यांनी निदर्शनास आणून दिले आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, “राज्याच्या कृषी विभागात ‘पीकविमा घोटाळा’, ‘खत आणि बियाणे लिंकिंग घोटाळा’, ‘औषध खरेदी घोटाळा’, तसेच ‘कृषी अवजारे व साहित्य घोटाळा’ असे अनेक महाघोटाळे झाले आहेत. या सर्व घोटाळ्यांबाबत मी स्वतः पुराव्यांसह लेखी तक्रार केली होती. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी यापैकी कोणत्याही घोटाळ्याची साधी चौकशीही केली नाही किंवा संबंधितांवर कोणतीही कारवाई केली नाही.” धाराशिवमधील ‘निविष्ठा घोटाळा’ आणि सरकारचा वरदहस्त तक्रारींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्यामुळे आणि भ्रष्टाचाऱ्यांना अभय दिल्यामुळे अधिकाऱ्यांचे फावले असल्याचा दावा शेट्टी यांनी केला आहे. “देवेंद्र फडणवीस हे भ्रष्टाचाऱ्यांना पाठीशी घालत आहेत. सरकारच्या याच भूमिकेमुळे आता धाराशिव जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात ‘निविष्ठा घोटाळा’ (बियाणे, खते आणि कृषी साहित्याच्या अनुदानात झालेला भ्रष्टाचार) उघडकीस आला आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले. ‘अर्थपूर्ण’ व्यवहारांतून प्रकरणांवर पडदा केवळ कृषी विभागच नव्हे, तर राज्यातील सर्वच विभागांत सध्या घोटाळ्यांचे पेव फुटले असल्याचा दावा राजू शेट्टी यांनी केला आहे. सरकारच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत ते म्हणाले, “राज्यात वेगवेगळ्या सर्वच विभागांत सध्या घोटाळे होत आहेत. या भ्रष्टाचारात राज्यातील मंत्र्यांपासून ते वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांचीच मिलीभगत आहे. त्यामुळेच अनेक गंभीर प्रकरणांवर ‘अर्थपूर्ण’ (आर्थिक देवाणघेवाण) व्यवहारांतून सोयीस्करपणे पडदा टाकला जात आहे.” ढपला संस्कृतीचे लाभार्थी होऊ नका! शेतकऱ्यांच्या हक्काच्या पैशांवर डल्ला मारणाऱ्या अधिकाऱ्यांवर आणि प्रवृत्तींवर तातडीने कारवाई करण्याची मागणी राजू शेट्टी यांनी केली आहे. शेवटी सरकारला इशारा देताना त्यांनी म्हटले आहे की, “राज्याचे मुख्यमंत्री आणि कृषी मंत्री यांनी राज्यात सध्या सुरू असलेल्या या ‘ढपला संस्कृतीचे’ (लुटमारीच्या संस्कृतीचे) लाभार्थी न होता, सामान्य जनतेला आणि बळीराजाला न्याय द्यावा. तसेच या सर्व घोटाळ्यांतील संबंधित गुन्हेगारांवर तातडीने कठोर कारवाई करावी.” राजू शेट्टी यांच्या या थेट आणि आक्रमक आरोपांमुळे आता राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, कृषी विभागातील या कथित घोटाळ्यांवर राज्य सरकार आणि कृषीमंत्री काय स्पष्टीकरण देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हेही वाचा.. मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी विशेष आर्थिक पॅकेज जाहीर करावे: खासदार बजरंग सोनवणे यांची PM मोदींकडे मागणी, कोणकोणत्या मागण्या केल्या? वाचा सविस्तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदारांच्या शिष्टमंडळाने खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. जवळपास अर्धा तास चाललेल्या या महत्त्वपूर्ण बैठकीत सर्व खासदारांनी आपापल्या मतदारसंघातील विविध प्रश्न आणि विकासाचे मुद्दे पंतप्रधानांसमोर मांडले. या भेटीनंतर, बैठकीत नेमक्या कोणकोणत्या मागण्यांवर चर्चा झाली आणि पंतप्रधानांसमोर कोणते विषय मांडण्यात आले, याबाबतची सविस्तर माहिती बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी दिली. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *