![]()
कळमनुरी तालुक्यातील पिंपरी व परिसरातील खरडणी अनुदानातील गैरव्यवहार प्रकरणात दोषींवर करावी या मागणीसाठी क्रांतीकारी शेतकरी संघटनेच्या वतीने सोमवारी ता. 10 तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. कळमनुरी तालुक्यातील येगाव, पिंपरी बुद्रूक, कृष्णापूर या शिवारामध्ये सन 2024-25 या आर्थिक वर्षात या परिसरात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्यामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या परिसरात नुकसानीचे अनुदान देण्यासाठी शेतकऱ्यांच्या याद्या तयार करण्यात आल्या होत्या. सदर याद्या ग्राम महसूल अधिकारी व कृषी सहाय्यक यांनी प्रमाणित करून दिल्या होत्या. मात्र या याद्यांमध्ये ज्यांच्याकडे जमीन नाही त्यांच्या नावे अनुदान देण्यात आले तर काही जणांना अत्यंत कमी अनुदान मिळाले. या संदर्भातील तक्रारीनंतर तहसील कार्यालयाने चौकशी केली होती. या चौकशीमध्ये खरा प्रकार उघड झाला असून त्यानंतर कृषी सहाय्यक एस. एस. संगमवार यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. मात्र या प्रकरणातील अन्य दोषींवर अद्यापही कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे प्रशासनाच्या कार्यपध्दतीवर संशय व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून शेतकऱ्यांवर झालेला अन्या दूर करावा तसेच प्रकरणातील अन्य दोषींवर कारवाई करावी या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला. क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष गजानन कावरखे यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आले्ल्या मोर्चात संघटनेचे जिल्हाध्यक्ष नामदेव पतंगे, पदाधिकारी चैतन्य चव्हाण, ज्ञानेश्वर जाधव, दिलीप जाधव, बाळू पाटील, शुभम मुळे, विलास जाधव, किसन सावंत, उत्तम थोरात, विजय जाधव, बाबाराव जाधव, प्रविण मते यांच्यासह शेतकरी सहभागी झाले होते. सदर मोर्चा तहसील कार्यालयावर आल्यानंतर तहसील प्रशासनाकडे निवेदन देण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांच्या मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासनाकडे सादर केले जाणार असून त्यानंतर पुढील कार्यवाही करण्याचे लेखी आश्वासन तहसीलदार जीवककुमार कांबळे यांनी दिले आहे.
Source link
कळमनुरीत क्रांतीकारी शेतकरी संघटनेचा तहसील कार्यालयावर मोर्चा:खरडणी अनुदान गैरव्यवहार प्रकरणातील दोषींवर कारवाईची मागणी