![]()
रांची येथे विद्यार्थ्यांनी परीक्षेतील गैरव्यवहार तसेच पेपर लीक प्रकरणावरून आंदोलन सुरू केले आहे. PSC-JSSC परीक्षांमधील कथित अनियमिततेचा निषेध करण्यासाठी हजारो विद्यार्थ्यांनी बॅरिकेड्स तोडून विधानसभेच्या गेटजवळ पोहोचले जात सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत आहेत. यावरून शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय निरुपम यांनी कॉंग्रेस व राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत त्यांनी रांची येथील कॉंग्रेस सरकारवर टीका केली आहे. संजय निरुपम म्हणाले, दिल्लीत काँग्रेस पक्ष आणि राहुल गांधी विद्यार्थ्यांच्या मुद्द्यावरून गोंधळ घालत आहेत. संसदेचे कामकाज चालू देत नाहीत. जंतरमंतरवर विद्यार्थ्यांचे जे आंदोलन सुरू होते, त्या आंदोलनावर पोलिसांनी लाठीचार्ज केला. हिंसक कारवाई करण्यात आली. या मुद्द्यावरून गेल्या दोन आठवड्यांपासून संसदेचे कामकाज ठप्प आहे. पुढे बोलताना संजय निरुपम म्हणाले, दुसरीकडे, रांचीमध्ये जिथे काँग्रेस पक्षाचे सरकार आहे, तिथे आज आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवर लाठ्यांनी हल्ला करण्यात आला. त्यांच्यावर लाठीचार्ज करण्यात आला. ते गेल्या दोन आठवड्यांपासून आंदोलन करत आहेत. झारखंड राज्य लोकसेवा आयोग आणि इतर सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये भयंकर भ्रष्टाचार होत आहे. सामान्य वर्गातील जे गरीब आणि आदिवासी मुले आहेत, त्यांना या परीक्षांमध्ये उत्तीर्ण केले जात नाही. आणि ज्यांच्या नियंत्रणाखाली झारखंडच्या या सर्व संस्था आहेत, ते लोक वशिलेबाजी करत आहेत. ते सर्व लोक आपापल्या कुटुंबातील सदस्यांना या परीक्षांमध्ये पास करत आहेत आणि त्यांना नोकऱ्या मिळवून देत आहेत, असा दावा निरुपम यांनी केला आहे. राहुल गांधींकडून एकही विधान आलेले नाही या भ्रष्टाचाराविरोधात जेव्हा विद्यार्थी आंदोलन करत आहेत, तेव्हा राहुल गांधींनी केवळ एक औपचारिकता म्हणून त्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. ते अद्याप रांचीला गेलेले नाहीत. आतापर्यंत सरकारची त्या विद्यार्थ्यांसोबत कोणतीही निर्णायक चर्चा झालेली नाही. आतापर्यंत त्या विद्यार्थ्यांच्या दुःखावर, त्यांच्या वेदनेवर काँग्रेस पक्षाकडून एकही निवेदन आलेले नाही. राहुल गांधींकडूनही एकही विधान आलेले नाही, असे संजय निरुपम म्हणाले. खांदा विद्यार्थ्यांचा आणि बंदूक काँग्रेसची तसेच यावरून हे स्पष्ट होते की, राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाला विद्यार्थ्यांची कोणतीही चिंता नाही. उलट त्यांना विद्यार्थ्यांच्या नावाने केवळ राजकारण करायचे आहे आणि राजकारण भडकवायचे आहे. राजकारणाच्या माध्यमातून ते या सरकारला लक्ष करून एक प्रकारे सरकारविरोधी मोहीम चालवत आहेत. म्हणजेच खांदा विद्यार्थ्यांचा आणि बंदूक काँग्रेसची, अशी टीका संजय निरुपम यांनी केली आहे. काँग्रेसच्या दुटप्पीपणाचा आम्ही तीव्र निषेध करतो काँग्रेसचा हा जो दुटप्पीपणा आहे, त्याचा आम्ही तीव्र निषेध करतो. आणि जर काँग्रेसला खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांबद्दल थोडीशीही चिंता असेल, तर त्यांनी तातडीने झारखंडमधील आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांसोबत बसून, चर्चा करून त्यांच्यासाठी मार्ग काढायला हवा, अशी मागणी संजय निरुपम यांनी केली आहे.
Source link
'विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन कॉंग्रेसचे राजकारण':रांचीतील लाठीचार्जवरून संजय निरुपमांचा राहुल गांधींवर घणाघात, नेमके काय म्हणाले?