Headlines

पुणे जिल्ह्यात 65 टक्के अर्जांचे डिजिटायझेशन पूर्ण:विशेष पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत 96 टक्के अर्जांचे वितरणही पूर्ण




पुणे जिल्ह्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत आतापर्यंत ९६ टक्के अर्जांचे वितरण पूर्ण झाले आहे. तसेच, ६५.५३ टक्के अर्जांचे डिजिटायझेशन पूर्ण झाले असल्याची माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित राजकीय पक्षांच्या साप्ताहिक बैठकीत कळसकर बोलत होत्या. यावेळी तहसीलदार शीतल मुळे यांच्यासह नॅशनल पीपल्स पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार), राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार), भारतीय जनता पक्ष, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), बहुजन समाज पार्टी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या राजकीय पक्षांचे जिल्हाध्यक्ष, शहरप्रमुख, सचिव तसेच प्रतिनिधी उपस्थित होते. अनुपस्थित, स्थलांतरित, मयत आणि दुबार मतदारांची यादी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे, असे मीनल कळसकर यांनी सांगितले. राजकीय पक्षांनी या याद्यांचे अवलोकन करून आवश्यक ती कार्यवाही करावी, असे आवाहन त्यांनी केले. मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी नमुना क्रमांक ६, ७ व ८ मधील अर्जांचे अवलोकन करण्याचे आवाहनही त्यांनी केले. मतदार यादी अधिक अचूक व अद्ययावत करण्यासाठी प्रशासन विशेष प्रयत्न करत आहे. या प्रक्रियेत राजकीय पक्षांचे सहकार्य महत्त्वाचे असून प्राप्त होणारे दावे व हरकती विहित मुदतीत निकाली काढण्यासाठी प्राधान्याने नियोजन करण्यात येत असल्याचे कळसकर यांनी स्पष्ट केले. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार पदवीधर व शिक्षक मतदार याद्या तयार करण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. या प्रक्रियेत शिक्षक व पदवीधर मतदारांची जास्तीत जास्त नोंदणी होण्यासाठी राजकीय पक्षांनी सहकार्य करावे, असे आवाहनही कळसकर यांनी केले. या बैठकीत विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रियेसंदर्भात त्यांच्या अडचणी व सूचना मांडल्या. उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर यांनी यावेळी संबंधित अडचणींचे निरसन केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *