Headlines

पिस्तूल विक्रीच्या तयारीत असलेल्या सराईतावर पोलिसांचा छापा:शस्त्रांसह अटक, संगममाहुली परिसरात सातारा शहर डी.बी. पथकाची धडक कारवाई




संगममाहुली पुलाच्या परिसरात बेकायदा पिस्तूल विक्रीच्या उद्देशाने आलेल्या पुणे जिल्ह्यातील सराईत गुन्हेगाराला सातारा शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण (डी.बी.) पथकाने सापळा रचून पकडले. त्याच्याकडून गावठी बनावटीचे पिस्तूल आणि तीन जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली. आदेश पांडुरंग बिरामणे (वय ३०, रा. धनकवडी, पुणे) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. सातारा शहरात बेकायदा शस्त्रांची वाहतूक व विक्री करणाऱ्यांवर लक्ष ठेवून कारवाई करण्याच्या सूचना वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी डी.बी. पथकाला दिल्या होत्या. त्यानुसार पथकाकडून संशयित व्यक्तींबाबत माहिती संकलित केली जात होती. याच तपासादरम्यान पुणे जिल्ह्यात गंभीर स्वरूपाचे सातहून अधिक गुन्हे दाखल असलेला आदेश बिरामणे हा संगममाहुली परिसरात पिस्तूल घेऊन येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने हालचाली करून दोन पंचांच्या उपस्थितीत संबंधित परिसरात सापळा लावला. रात्रीच्या वेळी संशयित पोलिसांच्या नजरेस पडताच त्याला कारवाईची चाहूल लागली. त्याने अंधाराचा फायदा घेत तेथून निसटण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी परिसराला वेढा देत त्याचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. पोलिसांनी घेतलेल्या झडतीमध्ये बिरामणे याच्या कमरेला गावठी पिस्तूल लपवून ठेवलेले आढळले. त्याच्याकडे तीन जिवंत काडतुसेही सापडली. शस्त्र बाळगण्याचा कोणताही अधिकृत परवाना नसल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी पिस्तूल व काडतुसे जप्त केली. आदेश बिरामणे याच्याविरुद्ध पुणे जिल्ह्यात सदोष मनुष्यवध, मारामारी, हाफ मर्डर तसेच मोक्का कायद्यांतर्गत कारवाईसह सातहून अधिक गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यामुळे त्याच्या अटकेमुळे बेकायदा शस्त्रांच्या व्यवहारातील आणखी काही धागेदोरे हाती लागण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुधीर मोरे तसेच डी.बी. पथकातील कर्मचाऱ्यांनी केली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *