![]()
‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून नागरिकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणाऱ्या एका मोठ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश करण्यात मुंबई पोलिसांच्या पश्चिम विभाग सायबर गुन्हे शाखेला मोठे यश आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी देशातील विविध राज्यांमध्ये एकाच वेळी विशेष मोहीम राबवून धाडी टाकत या टोळीतील 7 सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या आहेत. या भामट्यांनी एका नागरिकाला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची दहशत दाखवून तब्बल 1 कोटी 67 लाख 40 हजार रुपयांची मोठी फसवणूक केली होती. या टोळीने फसवणूक करण्यासाठी अत्यंत नियोजनबद्ध कट रचला होता. त्यांनी फिर्यादीला संपर्क साधून, त्यांच्या आधार कार्ड आणि पॅन कार्डचा वापर एका मोठ्या मनी लाँड्रिंगच्या गुन्ह्यामध्ये झाल्याचा खोटा बनाव रचला. तुमच्या बँक खात्यांची तातडीने तपासणी करणे गरजेचे असून सर्वोच्च न्यायालयातून तुमच्या विरोधात अटक वॉरंट निघाले आहे, अशी भीती त्यांना दाखवण्यात आली. या ‘डिजिटल अरेस्ट’ आणि कायदेशीर कारवाईच्या दहशतीखाली आरोपींनी फिर्यादीला तब्बल 1 कोटी 67 लाख रुपये स्वतःच्या विविध बँक खात्यांमध्ये ट्रान्सफर करण्यास भाग पाडले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडिताने तत्काळ मुंबई सायबर पोलिसांत धाव घेतली. 7 आरोपींना अटक आणि पोलीस कोठडी याप्रकरणी गुन्हा दाखल होताच सायबर पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरवली आणि देशात विविध ठिकाणी एकाच वेळी छापेमारी केली. या धडक कारवाईत संजय शाह, ऋषी रामचंद्र मीना, नौशाद अली, मोहम्मद खालीद सैफी, जगेश्वर महतो, जाबीर हुसेन आणि एका महिला आरोपीसह एकूण 7 जणांना अटक करण्यात आली. या सर्व आरोपींना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. मोठ्या प्रमाणात साहित्य जप्त; 34 लाख रुपये गोठवले सायबर पोलिसांनी अटक करण्यात आलेल्या या टोळीकडून फसवणुकीच्या गुन्ह्यात वापरण्यात आलेला मोठा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये 27 मोबाईल, 2 लॅपटॉप, 5 डिजिटल सही साधने यांसारख्या विद्युतीय उपकरणांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त बँकिंग आणि संपर्कासाठी वापरण्यात आलेली तब्बल 613 सिमकार्ड, 10 चेकबुक, 2 पासबुक आणि 2 एटीएम कार्ड देखील हस्तगत करण्यात आली आहेत. तसेच, आरोपींच्या विविध बँक खात्यांमधील 34 लाख रुपयांची रक्कम पोलिसांनी तातडीने गोठवली आहे. आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता या टोळीने अतिशय पद्धतशीरपणे एका नागरिकाची फसवणूक केल्याचे आतापर्यंतच्या तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे याच ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली त्यांनी देशभरात आणखी किती जणांना अशाच प्रकारे जाळ्यात ओढून त्यांची आर्थिक फसवणूक केली आहे? याचा सखोल तपास आता मुंबई पोलीस करत आहेत. पोलिसांच्या या पुढील तपासात फसवणुकीचे आणखी काही मोठे गुन्हे उघडकीस येण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
Source link
'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली कोट्यवधींची लूट:आंतरराज्यीय टोळी गजाआड; 7 मोबाईल, 613 सिमकार्डसह 2 लॅपटॉप हस्तगत