Headlines

सिंधुदुर्गात एकतर्फी प्रेमातून थरार:महाविद्यालयीन तरुणीची निर्घृण हत्या, कुडाळ तालुक्यातील वर्दे कडावल येथील धक्कादायक घटना




एकतर्फी प्रेमातून होणाऱ्या गुन्ह्यांच्या मालिका थांबण्याचे नाव घेत नसून, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील वर्दे कडावल गावात अशीच एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. एकतर्फी प्रेमातून दामिनी पालव या महाविद्यालयीन तरुणीची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणी सिंधुदुर्ग पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने वेगाने चक्रे फिरवत, हत्येनंतर फरार झालेल्या आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. साहिल धुरी असे या अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याची दामिनीशी ओळख झाली होती आणि त्यातून त्याचे तिच्यावर एकतर्फी प्रेम जडले होते. मात्र, दामिनीने त्याच्या या प्रेमाला कोणताही प्रतिसाद दिला नाही. याच दरम्यान दामिनीचे लग्न दुसरीकडे ठरले. या गोष्टीचा राग मनात धरून आरोपी साहिलने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा संशय आहे. पोलिसांनी साहिलला त्याच्या घरातून रात्रीच ताब्यात घेतले असून, त्याच्याकडील रक्ताने माखलेले कपडेही जप्त केले आहेत. थरारक घटनाक्रम आरोपी साहिल हा दामिनीच्या वाटेवर दबा धरून बसला होता. दामिनी महाविद्यालयातून एसटी बसने प्रवास करून आपल्या गावात उतरली आणि घराकडे पायी चालत निघाली होती. त्यावेळी आरोपीने तिची वाट अडवली आणि तिला आपले प्रेम स्वीकारण्याचा पुन्हा आग्रह धरला. दामिनीने यास स्पष्ट नकार देताच, संतापाच्या भरात साहिलने तिच्यावर धारदार शस्त्राने सपासप वार केले. या भीषण हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या दामिनीला जागीच आपले प्राण गमवावे लागले. पोलिस तपास आणि सुरक्षेचा प्रश्न या हत्येप्रकरणी पोलीस कसून तपास करत असून गुन्ह्याशी संबंधित सर्व पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे. आरोपीला न्यायालयात हजर करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, या दुर्दैवी घटनेमुळे महाविद्यालयीन तरुणी आणि महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. तसेच, सोशल मीडियाचा वापर करताना आपण कोणाशी मैत्री करतो आणि कोणाशी संवाद साधतो, याची योग्य पडताळणी करणे आजच्या काळात किती गरजेचे बनले आहे, हेही या घटनेने पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *