![]()
डोक्यावर विग लावून घरफोड्या करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला विश्रामबाग पोलिसांनी जेरबंद केले आहे. या कारवाईत ३७ लाख रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने हस्तगत करण्यात आले असून, विश्रामबाग, विश्रांतवाडी, काळेपडळ आणि दत्तवाडी परिसरातील नऊ घरफोड्यांचे गुन्हे उघडकीस आले आहेत. शंकरसिंग उर्फ कुणालसिंग जितेंद्रसिंग जुनी (वय २७, रा. रामटेकडी, हडपसर), रणबीरसिंग धनसिंग बावरी शिकलीगर (वय २६, रा. बडोदा, गुजरात), अक्षयसिंग उर्फ अक्षय बिरुसिंग जुनी (वय २२, रा. बिराजदार नगर, हडपसर) आणि सोनुसिंग शाखासिंग शिकलीगर उर्फ तीलपिटीया (वय २२, रा. बडोदा, गुजरात) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. मुख्य आरोपी शंकरसिंग उर्फ कुणालसिंग जुनी हा सराईत गुन्हेगार आहे. घरफोडी करताना ओळख पटू नये, यासाठी तो डोक्यावर बनावट केसांचा टोप (विग) आणि तोंडावर मास्क लावत असे. त्याच्या या वेशातील चित्रफीत समाजमाध्यमांवर प्रसारित झाली होती. भारती विद्यापीठ, आंबेगाव आणि मार्केटयार्ड पोलिसांच्या हद्दीत केलेल्या गुन्ह्यांनंतर तो गेल्या सहा महिन्यांपासून पोलिसांना हुलकावणी देत होता. विश्रामबाग पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याचा तपास करत असताना, पोलिस हवालदार नितीन मुंढे यांना बातमीदाराकडून माहिती मिळाली की, घरफोडीतील काही संशयित आरोपी उंड्री-पिसोळी परिसरात आहेत. आरोपी सतत आपले ठिकाण बदलत होते. त्यानंतर, आरोपी एका मोटारीने उंड्री-पिसोळी येथील डोंगराच्या रस्त्याने येत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून चौघांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. आरोपींनी चोरी केलेले सोन्याचे दागिने गुजरात येथील साथीदारांकडे ठेवले होते. ही कामगिरी पोलिस उपायुक्त कृषीकेश रावले, सहायक पोलिस आयुक्त अनुजा देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक नवनाथ जगताप, गुन्हे निरीक्षक विकास भिंगारदिवे, रमेश लाहिगुडे, सहायक पोलिस निरीक्षक उमेश कारके, उपनिरीक्षक मेहबुब मोकाशी, कर्मचारी अनिस शेख, शिवा गायकवाड, जाकीर मणियार, कैलास डुकरे, सचिन अहिवळे, शैलेश सुर्वे आणि महेश कदम यांच्या पथकाने केली.
Source link
37 लाखांचे दागिने हस्तगत, विग टोळी जेरबंद:पुणे पोलिसांकडून आंतरराज्यीय टोळीला अटक, 9 गुन्हे उघड