![]()
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी केलेल्या आरोपांवर तीव्र प्रतिक्रिया देत जोरदार पलटवार केला आहे. आदित्य ठाकरे यांचे नाव घेण्यामागे भाजपला कोणतेही कारण नव्हते, असे स्पष्ट करत त्यांनी भाजपवर निशाणा साधला. या संदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत राऊत यांनी भाजपच्या भूमिकेवर कडाडून टीका केली. राऊत म्हणाले की, भाजपचे लोक सध्या तमाशा बघत असतील, पण एक दिवस हेच प्रकरण त्यांच्या अंगावरही येईल. राज्यातील भाजपमधील मराठी नेत्यांनी या सगळ्यावर लाज वाटली पाहिजे, अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला. तसेच राजकीय हेतूने विरोधकांवर आरोप करण्याची पद्धत चुकीची असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. नेमके प्रकरण काय? संसदेच्या विशेष अधिवेशनात महिला आरक्षण विधेयकावर चर्चा सुरू असताना मोठा राजकीय वाद निर्माण झाला. शिवसेना (ठाकरे गट) खासदार अरविंद सावंत आणि भाजप खासदार निशिकांत दुबे यांच्यात तीव्र शाब्दिक चकमक झाली. सावंत यांनी ब्रिजभूषण सिंह आणि कुलदीप सेंगर यांचा उल्लेख करताच दुबे यांनी आदित्य ठाकरेंचे नाव घेत गंभीर आरोप केले. या वक्तव्यामुळे सभागृहात गदारोळ निर्माण झाला आणि वातावरण तापले. या घडामोडीनंतर ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत भाजपवर जोरदार हल्ला चढवला. भाजपने काही भुंकणारे लोक पाळून ठेवले आदित्य ठाकरेंचं नाव घेण्याचं कोणतंही कारण नव्हतं, असा ठाम आरोप त्यांनी केला. महाराष्ट्रातील नेत्यांची बदनामी करण्यासाठी जाणीवपूर्वक वातावरण तयार केलं जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. भाजपने काही भुंकणारे लोक पाळून ठेवले आहेत, अशा तीव्र शब्दांत त्यांनी टीका करत भाजपच्या मराठी नेत्यांनाही सुनावलं. दरम्यान, संसदेमध्ये अशा प्रकारे आरोप-प्रत्यारोप करणं ही लोकशाहीसाठी धोकादायक बाब असल्याचं राऊत यांनी नमूद केलं. पार्लमेंटचा गैरवापर होत असल्याचा आरोप करत त्यांनी याबाबत कारवाईची मागणी केली. निशिकांत दुबे यांच्यावर कोणतीही कारवाई होत नसल्याबद्दलही त्यांनी प्रश्न उपस्थित केला. ठाकरे कुटुंबावरील टीकेचा निषेध महाराष्ट्रातील नेत्यांवर बाहेरील नेते वारंवार टीका करत असताना राज्यातील भाजप नेते शांत का आहेत, असा सवालही राऊत यांनी उपस्थित केला. जर इतर कोणावर अशा प्रकारे हल्ला झाला असता तर आम्ही उभे राहिलो असतो, असं सांगत त्यांनी ठाकरे कुटुंबावरील टीकेचा निषेध केला. भाजपने तयार केलेलं वातावरण भविष्यात त्यांच्यावरच उलटेल, असा इशाराही त्यांनी दिला. महिलांच्या खात्यात पैसे टाकून मत मिळवण्याचा प्रयत्न दरम्यान, महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरही राऊत यांनी केंद्र सरकारवर टीका केली. 2023 मध्ये महिला आरक्षण विधेयक मंजूर झाले असताना ते तात्काळ लागू करण्याची गरज आहे, असे त्यांनी सांगितले. निवडणुका आल्या की महिलांच्या खात्यात पैसे टाकून मत मिळवण्याचा प्रयत्न करू नये, असेही त्यांनी सुनावले. धमक्या देण्यापेक्षा प्रत्यक्ष अंमलबजावणी करा, तेव्हाच महिलांचा खरा पाठिंबा कोणाला आहे हे समजेल, असा टोला त्यांनी भाजपला लगावला.महिला आरक्षण विधेयकाच्या चर्चेपासून सुरू झालेला हा वाद आता वैयक्तिक आरोपांपर्यंत पोहोचल्याने राजकीय वातावरण अधिकच तापले आहे. आगामी काळात या प्रकरणावर आणखी प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे.
Source link
आदित्य ठाकरेंचं नाव का घेतलं?:निशिकांत दुबे यांच्या आरोपांवर राऊतांचा संताप; महिला आरक्षणावरूनही राऊत आक्रमक