Headlines

सिंहगड रोडवरील सोसायटीत मध्यरात्री वाहनांची तोडफोड:सात ते आठ गाड्यांचे नुकसान; रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण




सिंहगड रोड परिसरातील सुयोग श्री सोसायटीमध्ये मध्यरात्री काही तरुणांनी गोंधळ घालत पार्किंगमधील सात ते आठ चारचाकी वाहनांची तोडफोड केल्याची घटना समोर आली आहे. सोमवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास घडलेल्या या प्रकारामुळे सोसायटीतील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काही तरुण हातात हत्यारे घेऊन सोसायटीच्या परिसरात आले. त्यांनी पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या वाहनांना लक्ष्य करत त्यांच्या काचा फोडल्या तसेच इतर भागांचेही नुकसान केले. अचानक झालेल्या आवाजामुळे रहिवासी जागे झाले. मात्र, तरुणांच्या हातात हत्यारे असल्याने कोणीही त्यांना रोखण्यासाठी पुढे आले नाही. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, तोडफोड करणारे तरुण मद्यधुंद अवस्थेत असल्याचा संशय आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर सिंहगड रोड पोलिसांनी तपास सुरू केला. संशयितांची ओळख पटवण्यासाठी सोसायटी आणि आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले जात आहे. या तोडफोडीमागे वैयक्तिक वाद होता की परिसरात दहशत निर्माण करण्याचा उद्देश होता, याचा शोध पोलिस घेत आहेत. दरम्यान, संबंधित तरुणांनी यापूर्वीही परिसरात वाहनांची तोडफोड केल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे. वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. नाहक नागरिकांच्या गाड्यांचे नुकसान झाल्याने नागरिकांकडून संताप देखील व्यक्त करण्यात येत आहे. आरोपींना तातडीने अटक करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे. पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज आणि प्रत्यक्षदर्शींच्या माहितीच्या आधारे संशयितांचा शोध सुरू आहे. पुढील तपास सिंहगड रोड पोलिस करीत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *