![]()
देशाच्या संसदेत आज महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून अभूतपूर्व राजकीय संघर्ष पाहायला मिळाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने सादर केलेले ‘संविधान १३१ वी दुरुस्ती विधेयक २०२६’ (नारी शक्ती वंदन अधिनियम) लोकसभेत आवश्यक तांत्रिक बहुमताअभावी नामंजूर झाले. घटनादुरुस्तीसाठी उपस्थित सदस्यांच्या दोन-तृतीयांश मतांची आवश्यकता असते, मात्र संख्याबळ न जुळल्याने हे ऐतिहासिक विधेयक रखडले आहे. या निकालावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर कडाडून हल्लाबोल केला असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याला लोकशाहीतील ‘काळा दिवस’ संबोधले आहे. लोकसभेत या विधेयकावर मतविभाजनाद्वारे मतदान घेण्यात आले. ५२८ खासदारांनी या प्रक्रियेत भाग घेतला होता. हे विधेयक मंजूर होण्यासाठी दोन-तृतीयांश बहुमत म्हणजेच ३५२ मतांची आवश्यकता होती. विधेयकाच्या बाजूने २९८ मते पडली, तर विरोधात २३० मते मिळाली. बहुमतासाठी ५४ मतांची कमतरता भासल्याने लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी विधेयक नामंजूर झाल्याचे घोषित केले. यानंतर संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी सीमांकन आणि केंद्रशासित प्रदेश कायद्याशी संबंधित इतर दोन विधेयके तूर्तास पुढे न नेण्याचा निर्णय घेतला. विरोधकांनी नारीशक्तीचा अपमान केला: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधेयक नामंजूर झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत तीव्र संताप व्यक्त केला. ते म्हणाले, “देशातील महिलांना आरक्षण मिळावे ही आमची बांधिलकी आहे, पण विरोधकांनी केवळ राजकीय अहंकारासाठी या ऐतिहासिक संधीचा बळी दिला. नारीशक्तीच्या बाजूने उभे राहण्याऐवजी विरोधकांनी ‘नौटंकी’ला प्राधान्य दिले. भारताची नारीशक्ती हा अपमान विसरणार नाही. आम्ही केवळ भाषणांमध्ये महिला सक्षमीकरण मानत नाही, तर ती आमची श्रद्धा आहे. या अन्यायाविरोधात आम्ही उद्यापासून रस्त्यावर उतरून जनआंदोलन करू,” असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला. लाडक्या बहिणींचे रौद्र रूप दिसेल: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या निकालावर ट्विट करत महाविकास आघाडी आणि काँग्रेसवर निशाणा साधला. “आजचा दिवस देशाच्या इतिहासातील काळा दिवस आहे. काँग्रेस आणि इंडी (I.N.D.I.A.) आघाडीने गरीब, दलित आणि आदिवासी माता-भगिनींना संसदेत जाण्यापासून रोखले आहे. पंतप्रधान मोदींनी महिलांना न्याय देण्याचा ऐतिहासिक प्रयत्न केला, पण विरोधकांचा महिलांप्रती असलेला आकस आज उघड झाला आहे. आता येणाऱ्या काळात विरोधकांना आमच्या लाडक्या बहिणींचे रौद्र रूप पाहायला मिळेल,” असा इशारा शिंदे यांनी दिला. सभागृहात रंगला ‘कलगीतुरा’ मतदानापूर्वी सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. सरकारकडून पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांनी विधेयकाचे महत्त्व पटवून दिले. तर दुसरीकडे राहुल गांधी, प्रियांका गांधी, अखिलेश यादव, अमोल कोल्हे आणि वर्षा गायकवाड यांनी विधेयकातील तरतुदींवर प्रश्न उपस्थित करत विरोध दर्शवला.
Source link
लोकसभेत महिला आरक्षण विधेयक नामंजूर:उद्यापासून रस्त्यावर उतरणार, CM फडणवीसांचा एल्गार; शिंदेंचाही हल्लाबोल