Headlines

मराठवाड्यात 18, तर विदर्भात 19 एप्रिलपर्यंत उष्णतेचा प्रचंड तडाखा:पुढील चार दिवस निर्णायक, प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा




राज्यात सध्या उष्णतेची तीव्र लाट जाणवत असून अनेक भागांमध्ये तापमानाने उच्चांक गाठला आहे. विशेषतः पुणे शहरात उष्णतेचा तडाखा अधिक जाणवत असून तापमान 40 ते 41 अंश सेल्सियस दरम्यान स्थिर आहे. लोहगाव परिसरात सलग दुसऱ्या दिवशी तापमान 42 अंशांवर पोहोचल्याने नागरिकांना उकाड्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर पुढील काही दिवस परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार राज्यातील विविध भागांत उष्णतेची लाट कायम राहणार आहे. मध्य महाराष्ट्रात 18 एप्रिलपर्यंत, मराठवाड्यात 16 ते 18 एप्रिलदरम्यान, तर विदर्भात 15 ते 19 एप्रिलदरम्यान उष्णतेची तीव्रता अधिक राहणार आहे. कोकण भागातही 17 एप्रिल रोजी काही ठिकाणी उष्ण आणि दमट हवामानाचा अनुभव येऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी या काळात विशेष काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. दरम्यान, पुणेकरांसाठी थोडासा दिलासा देणारी बाब म्हणजे 18 आणि 19 एप्रिल रोजी शहरात आणि जिल्ह्यात तुरळक पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या हलक्या पावसामुळे तापमानात काही प्रमाणात घट होऊ शकते. मात्र, 16 ते 18 एप्रिलदरम्यान तापमानात मोठा बदल होणार नसून 19 ते 22 एप्रिलदरम्यान 2 ते 3 अंशांनी घट होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करत काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. उष्णतेपासून बचाव करण्यासाठी भरपूर पाणी आणि ओआरएसचे सेवन करणे आवश्यक आहे. हलक्या रंगाचे सैल सुती कपडे वापरणे, घराबाहेर पडताना टोपी किंवा छत्रीचा वापर करणे, तसेच शक्यतो सावलीत विश्रांती घेणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे. विशेषतः दुपारी 12 ते 4 या वेळेत बाहेर जाणे टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे. याशिवाय काही गोष्टी टाळण्याचाही सल्ला देण्यात आला आहे. दुपारच्या वेळेत कष्टाची कामे करणे टाळावे, अनवाणी उन्हात चालू नये, तसेच मद्य, चहा, कॉफी आणि जास्त साखरयुक्त पेये कमी प्रमाणात घ्यावीत. लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना बंद वाहनात ठेवू नये. कारखान्यांमध्ये, विशेषतः जास्त तापमान असलेल्या ठिकाणी काम करणाऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी, कारण अशा परिस्थितीत उष्माघाताचा धोका वाढतो. सर्वाधिक परिणाम मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींवर उष्णतेचा सर्वाधिक परिणाम लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला आणि आजारी व्यक्तींवर होऊ शकतो. त्यामुळे या घटकांनी विशेष दक्षता घेणे आवश्यक आहे. शरीरात जास्त घाम येणे, तहान वाढणे, त्वचा कोरडी पडणे, ताप वाढणे, चक्कर येणे किंवा उलटी होणे ही उष्माघाताची लक्षणे असू शकतात. अशी लक्षणे दिसल्यास तात्काळ रुग्णाला थंड ठिकाणी नेऊन जवळच्या रुग्णालयात उपचार घेण्याचा सल्ला प्रशासनाने दिला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *