Headlines

गुंतवणुकीच्या आमिषाने ज्येष्ठाची 96 लाखांची फसवणूक:शेअर बाजारात चांगल्या परताव्याचे आमिष दाखवले




पुण्यात शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष दाखवून एका ७८ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची ९६ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सायबर चोरट्यांविरुद्ध शिवाजीनगर येथील सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोथरूडमधील भुसारी कॉलनी येथे राहणाऱ्या या ज्येष्ठ नागरिकाला २८ जून रोजी सायबर चोरट्यांनी मोबाइलवर संदेश पाठवला होता. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष त्यांना दाखवण्यात आले. चोरट्यांनी त्यांना एका ॲपद्वारे गुंतवणूक योजनेची माहिती देण्यास सांगितले. सुरुवातीला काही रक्कम भरल्यानंतर, चोरट्यांनी त्यांना परतावा मिळाल्याचे भासवले, मात्र प्रत्यक्षात कोणताही परतावा दिला नाही. गेल्या दोन महिन्यांत ज्येष्ठ नागरिकांनी सायबर चोरट्यांच्या बँक खात्यात वेळोवेळी ९६ लाख ५० हजार रुपये जमा केले. परताव्याबाबत विचारणा केली असता फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. या प्रकरणी ज्येष्ठ नागरिकाने पोलिसांकडे तक्रार दिली असून, पोलीस निरीक्षक शरद शेळके पुढील तपास करत आहेत. फेसबुक ॲड अकाउंट हॅक करून 11.77 लाखांचा गंडा; कोरेगाव पार्कमध्ये गुन्हा दरम्यान, दुसऱ्या घटनेत फेसबुकवरील कंपनीच्या जाहिरात अकाउंटचा बेकायदेशीरपणे ताबा घेऊन ११ लाख ७७ हजार ६२२ रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचा दुसरा प्रकार समोर आला आहे. कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लुंकड गोल्ड कोस्ट, विमाननगर येथील रहिवासी तथागत कौशिक (वय ४५) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. ढोले पाटील रस्त्यावरील ‘हिलिंग हँड्स अँड हर्ब्स प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीची जाहिरात फेसबुक ॲड मॅनेजरद्वारे चालवली जात होती. अज्ञात व्यक्तीने या जाहिरात अकाउंटचा अनधिकृतपणे ॲक्सेस मिळवला. फिर्यादी आणि एजन्सी पार्टनरच्या परवानगीशिवाय या अकाउंटवरून ‘२०२५ अमेरिकन गोल्ड ईगल टाइमलेस ब्युटी’ या नावाने बनावट जाहिराती प्रसारित करण्यात आल्या. या जाहिरातींसाठी कंपनीच्या अकाउंटमधून ११ लाख ७७ हजार ६२२ रुपयांचा वापर झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. अकाउंटचा ताबा घेणाऱ्या व्यक्तीचा तांत्रिक तपास सुरू आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *