![]()
आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ढोल-ताशा पथकांना सरावासाठी आवश्यक जागा आणि प्रशासकीय परवानग्या तातडीने उपलब्ध करून द्याव्यात, अशी सूचना महापौर मंजुषा नागपुरे यांनी पुणे महापालिका प्रशासनाला केली आहे. विविध विभागांकडून स्वतंत्र परवानग्या घेण्याची गरज भासू नये, यासाठी पथकांसाठी ‘एक खिडकी’ व्यवस्था सुरू करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले. पुण्याचा गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव नसून शहराच्या सांस्कृतिक आणि सामाजिक परंपरेचे प्रतीक आहे. ढोल-ताशा पथके या परंपरेचा अविभाज्य भाग असून, हजारो युवक-युवती शिस्त, सांघिक भावना आणि संस्कारांच्या माध्यमातून या लोककलेचे जतन करतात. त्यामुळे या परंपरेला प्रोत्साहन देताना पथकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे महत्त्वाचे असल्याचे महापौर नागपुरे यांनी नमूद केले. महापालिकेची मोकळी मैदाने, उपलब्ध जागा तसेच वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही अशा योग्य ठिकाणी ढोल-ताशा पथकांना सरावासाठी प्राधान्याने जागा उपलब्ध करून द्यावी. सरावाच्या ठिकाणी आवश्यकतेनुसार प्रकाशव्यवस्था, स्वच्छता आणि पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याबाबतही प्रशासनाने कार्यवाही करावी, अशा सूचना त्यांनी दिल्या. ढोल-ताशा पथकांना विविध विभागांकडून स्वतंत्र परवानग्या घेताना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी महापालिकेने ‘एक खिडकी’ प्रणाली किंवा सोपी ऑनलाइन/ऑफलाइन परवानगी व्यवस्था उपलब्ध करून द्यावी. संबंधित विभागांमध्ये समन्वय साधून परवानगीची प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करण्याचे नियोजन करावे, असेही नागपुरे यांनी सांगितले. दरम्यान, ढोल-ताशा सरावाच्या वेळी ध्वनीप्रदूषण, सरावाच्या वेळेची मर्यादा आणि वाहतुकीच्या नियमांचे पालन होणे आवश्यक आहे. नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी महापालिका प्रशासनाने पोलीस प्रशासनाशी समन्वय साधून स्पष्ट मार्गदर्शक सूचना निश्चित कराव्यात, असेही महापौरांनी सूचित केले. “पुण्याची सांस्कृतिक ओळख असलेल्या ढोल-ताशा परंपरेला प्रोत्साहन देणे ही सामूहिक जबाबदारी आहे. नियमांचे पालन करून सराव करणाऱ्या पथकांना प्रशासकीय प्रक्रियेमुळे अडचणी येऊ नयेत. त्यांना आवश्यक सुविधा आणि परवानग्या सुलभपणे मिळाव्यात, यासाठी संबंधित विभागांनी तातडीने कार्यवाही करावी,” असे महापौर मंजुषा नागपुरे यांनी म्हटले. आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ढोल-ताशा पथकांसाठी सुरक्षित आणि शिस्तबद्ध सरावाची व्यवस्था करण्यासोबतच नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी महापालिका प्रशासनाने आतापासूनच नियोजन करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
Source link
ढोल-ताशा पथकांना सरावासाठी जागा उपलब्ध करा:परवानगीसाठी 'एक खिडकी' व्यवस्था, महापौर मंजुषा नागपुरे यांची मागणी