![]()
अहंकारी माणसाला स्तुती तर लोभी माणसाला पैसा प्रिय असतो. मुद्द्याच्या गोष्टी लपवून ठेवून भलत्याच कर्मकांडात गुंतवून ठेवणारे कधीच संत होऊ शकत नाहीत. विचाराने नाही तर आचाराने संतोष असणाऱ्याचे अनुकरण केले तर जीवनात कधीच मागे वळून पाहण्याची वेळ येणार नाही. मनुष्याने धनसंपत्ती कितीही कमवली तरी संतसंगतीशिवाय जीवनात समाधान लाभत नाही, असे प्रतिपादन मुरारी महाराज यांनी केले. नादरपूर येथे सुरेंद्र महाराज आनंदे (दौलताबाद) यांच्या आशीर्वादाने व बाबासाहेब महाराज आनंदे यांच्या अध्यक्षखाली संत सावता महाराज चरित्र अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले होते. या सप्ताहाचा बुधवारी समारोप झाला. काल्याच्या कीर्तनात मुरारी महाराज बोलत होते. मुरारी महाराज म्हणाले की, मीपणाचा अहंकार झाला असून मीच समर्थ समजू लागलो आहे. परंतु या जगात संताशिवाय कोणीही समर्थ नसल्याचे ते म्हणाले. संत साहित्य मानवासाठी प्रेरक असून विविध धर्मग्रंथांनी मानवाला आत्मकल्याणाचा मार्ग दाखवला आहे. या मार्गावर चालून सर्वांनी आपले जीवन सत्कर्मी लावावे. श्री संत सावता महाराज चरित्र, विष्णुसहस्रनाम म्हणजे दुःख समूळ नष्ट करणारे अमृत आहे, असे मुरारी महाराज आनंदे यांनी सांगितले. नंतर महाप्रसाद झाला. या वेळी मृदंगाचार्य अमोल महाराज ढमाले, गायनाचार्य संदीप महाराज काचोळे, गणेश महाराज कोळंबी, शेलार महाराज, कैलास महाराज गोरे, गावकरी उपस्थित होते.
Source link
अहंकारी माणसाला स्तुती तर लोभी माणसाला पैसा प्रिय:नादरपूर येथील सप्ताहामध्ये मुरारी महाराजांचे प्रतिपादन