![]()
येथिल महात्मा फुले कला, वाणिज्य व सीतारामजी चौधरी विज्ञान महाविद्यालयातील वनस्पतिशास्त्र विभागातर्फे नागठाणा परिसरात निसर्ग संवर्धनासाठी बीजप्रसारण व वृक्षारोपणाचा स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला आहे. हा उपक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप हांडे यांच्या मार्गदर्शनाखाली झाला. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षसंवर्धन, जैवविविधतेचे संरक्षण आणि हरित परिसर निर्मितीची गरज वाढत आहे. हे लक्षात घेऊन आयोजित केलेल्या या उपक्रमात विद्यार्थ्यांना वृक्षारोपणासह बीजप्रसारण , रोपांचे संगोपन आणि जैवविविधता संवर्धन याबाबत प्रत्यक्ष अनुभव देण्यात आला. विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या बियांचे प्रसारण करून नैसर्गिक पद्धतीने वनस्पतींची संख्या वाढवण्याचा प्रयत्न केला. तसेच योग्य ठिकाणी विविध रोपांची लागवड करून त्यांच्या भविष्यातील संगोपनाची जबाबदारीही स्वीकारली. स्थानिक हवामान व भौगोलिक परिस्थितीला अनुकूल असलेल्या वनस्पतींच्या बियांचा परिसरात प्रसार करण्यात आला. पावसाळ्यातील अनुकूल वातावरणामुळे या बियांपासून नवीन रोपे निर्माण होऊन परिसर अधिक हिरवागार होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. वाढते शहरीकरण, जंगलतोड, मानवी हस्तक्षेप आणि हवामान बदलामुळे नैसर्गिक अधिवासावर परिणाम होत असून अनेक वनस्पती व जीवसृष्टीसमोर आव्हाने निर्माण झाली आहेत. अशा परिस्थितीत स्थानिक वनस्पतींचे संवर्धन करणे आणि त्यांची संख्या वाढवणे अत्यंत आवश्यक असल्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. वनस्पतिशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. संजय सातपुते, डॉ. मंगेश बोबडे, डॉ. प्रांजली देशमुख व प्रा. शुभम साखरे यांनी उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले. या उपक्रमात विभागातील ४२ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. अर्थात निसर्गाचे संगोपन करा, हिरवेगार भविष्य घडवा हा संदेश देत विद्यार्थ्यांनी पर्यावरण रक्षणासाठी प्रत्यक्ष कृतीतून आपली सामाजिक बांधिलकी जपली.
Source link
वरूड येथील वनस्पतिशास्त्र विभागातर्फे नागठाणा परिसरात वृक्षारोपण उपक्रम:नैसर्गिक पद्धतीने वनस्पतींची संख्या वाढवण्याचा महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा प्रयत्न