Headlines

मुंबईत जंगलराज; लोकप्रतिनिधी, सेलिब्रिटीही असुरक्षित:कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला: खासदार वर्षा गायकवाड




मुंबईतील वाढती गुन्हेगारी, लोकप्रतिनिधी आणि सेलिब्रिटींच्या सुरक्षेचा प्रश्न तसेच कायदा-सुव्यवस्थेच्या ढासळत्या स्थितीवरून मुंबई काँग्रेसने राज्य सरकार आणि पोलिस प्रशासनावर जोरदार टीका केली आहे. मुंबईत लोकप्रतिनिधींपासून चित्रपट कलाकारांपर्यंत कोणीही सुरक्षित नसल्याचे चित्र दिसत असून, शहरात कायदा-सुव्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाला आहे. जागतिक दर्जाचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईत जंगलराज निर्माण झाले आहे. राज्याला पूर्णवेळ सक्षम गृहमंत्री नसल्याने गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यात सरकार अपयशी ठरत असल्याचा आरोप मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष तथा खासदार वर्षा गायकवाड यांनी केला. कायदा-सुव्यवस्थेच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी खासदार वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली मुंबई काँग्रेसच्या शिष्टमंडळाने रविवारी मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती यांची भेट घेतली. यावेळी शहरातील वाढती गुन्हेगारी, महिला अत्याचार, अलीकडील गोळीबाराच्या घटना, राजकीय पदाधिकाऱ्यांच्या हत्या तसेच IIT बॉम्बेमधील विद्यार्थी साहिल वाकोडे प्रकरण आणि आदिवासी विद्यार्थ्यांवरील कथित पोलिस कारवाईचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. या सर्व प्रकरणांमध्ये योग्य ती कारवाई करण्याची मागणी करत शिष्टमंडळाने पोलीस आयुक्तांना निवेदन सादर केले. मुंबई पोलिसांचा पूर्वीसारखा दबदबा राहिला नाही मुंबई पोलिसांची देशभरात एक गौरवशाली परंपरा आणि स्वतंत्र ओळख आहे. मात्र, अलीकडच्या काळात शहरात घडणाऱ्या गंभीर गुन्ह्यांमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. गुन्हेगारांमध्ये पोलिसांचा पूर्वीसारखा धाक राहिलेला नाही आणि गुन्हेगारीने पुन्हा डोके वर काढले आहे, अशी टीका वर्षा गायकवाड यांनी केली. मुंबईसारख्या महत्त्वाच्या महानगरात सामान्य नागरिकांना सुरक्षिततेची हमी मिळणे आवश्यक आहे. मात्र, शहरात लोकप्रतिनिधी आणि चित्रपट क्षेत्रातील कलाकारांनाही लक्ष्य केले जात असल्याच्या घटनांमुळे सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. प्रभावी पोलिसिंग आणि गुन्हेगारांवर कठोर कारवाई करून मुंबई पोलिसांचा नावलौकिक कायम राखण्याची गरज असल्याचे गायकवाड यांनी सांगितले. टायगर श्रॉफवरील हल्ल्यासह गोळीबाराच्या घटनांचा मुद्दा उपस्थित अभिनेता टायगर श्रॉफवरील हल्ल्याची घटना गंभीर असून, मुंबईतील सुरक्षिततेच्या परिस्थितीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे, असे काँग्रेसच्या शिष्टमंडळाने नमूद केले. यापूर्वी आमदार बाबा सिद्दीकी यांची हत्या, चित्रपट निर्माता रोहित शेट्टी आणि अभिनेता सलमान खान यांच्या घरांवर झालेल्या गोळीबाराच्या घटना तसेच ठाण्यातील एका पक्ष पदाधिकाऱ्याची निर्घृण हत्या यांचाही संदर्भ देण्यात आला. या घटनांमुळे गुन्हेगारांना कायद्याचा धाक राहिला आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे. मुंबईत गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी अधिक प्रभावी उपाययोजना कराव्यात आणि नागरिकांसह राजकीय पदाधिकारी व चित्रपट क्षेत्रातील व्यक्तींच्या सुरक्षेला प्राधान्य द्यावे, अशी मागणी शिष्टमंडळाने केली. महिलांवरील अत्याचार आणि शहरातील वाढत्या गुन्हेगारीचाही यावेळी आढावा घेण्यात आला. गुन्हेगारीच्या घटनांना प्रतिबंध घालण्याबरोबरच गंभीर प्रकरणांचा तपास वेगाने पूर्ण करून दोषींवर कठोर कारवाई करणे आवश्यक असल्याचे काँग्रेसच्या प्रतिनिधींनी सांगितले. साहिल वाकोडे प्रकरणाचा SIT आणि क्राइम ब्रँचकडून तपास IIT बॉम्बेमधील विद्यार्थी साहिल वाकोडे याच्याशी संबंधित प्रकरणाचाही पोलीस आयुक्तांच्या भेटीत मुद्दा उपस्थित करण्यात आला. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन तपास पूर्ण करावा आणि संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने केली. या प्रकरणाचा तपास विशेष तपास पथक (SIT) आणि क्राइम ब्रँचकडून सुरू आहे. तपास पूर्ण झाल्यानंतर संबंधितांवर योग्य ती कारवाई केली जाईल, असे आश्वासन पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी दिल्याची माहिती खासदार वर्षा गायकवाड यांनी दिली. या प्रकरणातील सत्य समोर येऊन संबंधितांना न्याय मिळणे महत्त्वाचे असल्याचेही शिष्टमंडळाने अधोरेखित केले. तपासात कोणतीही दिरंगाई न करता आवश्यक ती कायदेशीर कार्यवाही करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. आदिवासी विद्यार्थ्यांच्या कथित मारहाणीचा मुद्दाही ऐरणीवर काँग्रेसच्या कार्यालयात घुसून आदिवासी विद्यार्थ्यांना ताब्यात घेण्यात आले आणि त्यांना मारहाण करण्यात आल्याचा आरोपही शिष्टमंडळाने पोलीस आयुक्तांसमोर मांडला. या घटनेची निष्पक्ष चौकशी करून संबंधित पोलिसांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. या आरोपांबाबत पुरावे सादर करण्यास सांगण्यात आले असून, पुरावे मिळाल्यानंतर संबंधितांवर योग्य ती कारवाई केली जाईल, असे आश्वासन पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी दिल्याचे वर्षा गायकवाड यांनी सांगितले. त्यामुळे या प्रकरणात पुढे कोणती कारवाई होते, याकडे लक्ष लागले आहे. मुंबई पोलिसांचा नावलौकिक कायम राखण्याची मागणी मुंबई काँग्रेसच्या शिष्टमंडळाने शहरातील कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नावर चिंता व्यक्त करत पोलिस प्रशासनाने अधिक सतर्कतेने काम करण्याची गरज मांडली. गुन्हेगारी घटनांना प्रतिबंध घालणे, गंभीर गुन्ह्यांचा तपास वेळेत पूर्ण करणे आणि नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करणे यासाठी ठोस पावले उचलावीत, अशी मागणी करण्यात आली. या भेटीवेळी माजी मंत्री अस्लम शेख, आमदार भाई जगताप, आमदार ज्योती गायकवाड, राजेश शर्मा, चरणसिंग सप्रा, सुरेशचंद्र राजहंस, अखिलेश यादव, वीरेंद्र चौधरी, ट्युलिप मेरिंडा आदी उपस्थित होते. मुंबईतील वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने उपस्थित केलेले प्रश्न आणि पोलीस आयुक्तांनी दिलेली आश्वासने यामुळे साहिल वाकोडे प्रकरणासह आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रकरणातील पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हेही वाचा…. पानिपत ते कॅलिफोर्निया व्हाया ‘डंकी रूट:टायगर श्रॉफवर 10 गोळ्या झाडणारा बिश्नोई गँगचा नवा शूटर मास्टरमाईंड अनिल पंडित नेमका कोण? जुहू गोळीबाराने बॉलिवूड हादरले माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची हत्या आणि अभिनेता सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटवरील गोळीबाराच्या घटनेनंतर मुंबईत पुन्हा एकदा अंडरवर्ल्ड गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई टोळीने थेट बॉलिवूडला लक्ष्य केले आहे. रविवारी (18 ऑक्टोबर) संध्याकाळी जुहू पोलीस ठाण्यापासून अवघ्या 100 मीटर अंतरावर प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता टायगर श्रॉफ याच्या बीएमडब्ल्यू (BMW) कारवर बाईकवरून आलेल्या हल्लेखोरांनी तब्बल 10 राऊंड अंधाधुंद गोळीबार केला. या भीषण हल्ल्यातून टायगर श्रॉफ सुदैवाने थोडक्यात बचावला असला, तरी त्याचा कारचालक आणि एक चाहता गंभीर जखमी झाले आहेत. या थरारक हल्ल्यानंतर परदेशातून एक ऑडिओ क्लिप आणि सोशल मीडिया पोस्ट जारी करत बिश्नोई टोळीचा नवा म्होरक्या अनिल पंडित आणि हरमन संधू यांनी या हल्ल्याची थेट जबाबदारी स्वीकारली आहे. सविस्तर वाचा…



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *